मांजर आडवे गेले तरी; नितेश राणेंच्या टीकेला शिवसेनेचं प्रतिउत्तर

मुंबई- आमदार भास्कर जाधव यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींची केलेली नक्कल पहिल्या दिवशी चांगलीच चर्चेत आली होती. या नकलेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्याविरुद्ध आपण हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचा मुद्दाही गाजला. त्यानंतर, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरेंची एंट्री होताना आमदार नितेश राणेंनी त्यांची उडवलेली खिल्ली महाराष्ट्रभर व्हायरल झाली.
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते. त्यावेळी, नेमकं आदित्य ठाकरे पायरी चढून वर जात असताना, नितेश राणेंनी त्यांच्याकडे पाहून म्याव.. म्याव… असा आवाज काढला. नितेश राणेंच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता,राणेंच्या या व्हिडिओला पाहिल्यानंतर शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय.
शिवसेनेचे विधानपरिषद आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी ट्विट करुन राणेंना टोला लगावला आहे. ‘मांजर आडव गेले तरी थांबू नये, ही प्रबोधनकारांची थोर शिकवण महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तंतोतंत पाळली!’, असे ट्विट कायंदे यांनी केलं आहे. त्यासोबतच, म्याव.. म्याव… हा हॅशटॅगही त्यांनी वापरला. नितेश राणेंच्या कृत्यावर शिवसेनेकडून अद्याप प्रत्युत्तर देण्यात आलं नव्हतं. मात्र, मनिषा कायंदे यांनी ट्विट करुन राणेंवर पलटवार केला आहे.






