शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील यांची निर्घृण हत्या
तिवसा (अमरावती) : शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख ३४ वर्षीय अमोल पाटील मित्रासोबत बारमध्ये दारू पिण्यास गेले होते त्यावेळी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अमोल पाटील यांच्या डोळ्यात रात्री ५ जणांनी मिरचीपूड फेकली आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
तिवसा शहरातून जाणाऱ्या अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आशीर्वाद वाईन बारसमोर अमोल पाटील मित्रासोबत शनिवारी रात्री आशीर्वाद बारमध्ये गेला होता. मात्र बार बंद झाल्याने दोघंही बारसमोर बसले होते. यावेळी पाच जणांनी अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याची हत्या केली. बारसमोर दारू पित असल्याची संधी साधून ५ आरोपींनी अमोल पाटील यांच्यावर हल्ला चढवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेचं वृत्त वार्यासारखं शहरात पसरलं. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक रिता ऊईके यांनी तातडीने तपास हाती घेत शनिवारी रात्री उशिरापर्यंत ४ आरोपींना अटक केली. तर १ आरोपी फरार आहे.
संदीप रामदास ढोबाळे (वय ४२), प्रविण रामदास ढोबाळे, प्रविण उर्फ अविनाश एकनाथ पांडे (वय ३०) आणि रुपेश घागरे (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण तिवसा शहरातील रहिवाशी आहेत.
ही हत्या अवैध धंद्यातून झाली असल्याची चर्चा आहे. अमोल पाटील याच्यावर याआधी दोन हत्या केल्याचा आरोप होता. त्याला या प्रकरणांमध्ये अटकही करण्यात आली होती. कट रचून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.