महाराष्ट्र

राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं विठूरायाला साकडं..

नगरचे काळे दांम्पत्य मानाचे वारकरी ! काळे दाम्पत्य मानाचे वारकरी

 पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी संपूर्ण शिंदे कुटूंब उपस्थित होते. अहमनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातल्या वाकडी येथील भाऊसाहेब काळे आणि त्यांच्या पत्नी मंगल काळे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. ‘बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, राज्यात पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, राज्यातील जनता सुखी समाधानी आणि आनंदी रहावी असं साकडे विठुरायाच्या चरणी घातल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.  

गेल्या महिन्याभरापासून पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेला वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरात दाखल झाला आणि अवघी पंढरी विठ्ठल-रखुमाईच्या नावाने दुमदुमून गेली. शासकीय महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या विकास आराखड्यासह इतर अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आषाढी एकादशीनिमित्त आज मला आणि माझ्या कुटुंबाला शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मिळालं, त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरामध्ये मंगलमय वातावरण झालेलं आहे, असं शिंदे म्हणाले. लाखो वारकऱ्यांची गैरसोय नाही म्हणून मी ३-४ दिवसापूर्वी पंढरपुरात आलो होतो. यावर्षी उत्तम नियोजन आपण पाहिलं. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या सगळ्यांनी मिळून अतिशय उत्तम नियोजन केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. वारकरी बंधूंनी सहकार्य केले त्यांचे मी आभारी आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. 

काळे दाम्पत्यांची २५ वर्षांपासून आषाढीची पायी वारी यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान अहमनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातल्या वाकडी येथील काळे दाम्पत्याला मिळाला. भाऊसाहेब काळे आणि त्यांच्या पत्नी मंगल काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शासकीय महापूजा केली. काळे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून आषाढीची पायी वारी करीत आहे. शासकीय महापूजेचा मान मिळाल्यानंतर काळे दाम्पत्याला गहिवरून आले होते. आज एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन व्हावे यासाठी ते सकाळी सहा वाजता रांगेत उभा राहिलो होते. असा महापूजेचा मान मिळेल असे कधी वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया भाऊसाहेब काळे आणि त्यांच्या पत्नी मंगल काळे यांनी दिली.सर्व कर्ता करविता तो पांडुरंग आहे. आज आमच्या जीवनाचे सार्थक झाले, आम्ही धन्य झालो, असंही काळे दाम्पत्य म्हणाले. नेवासा तालुक्यातील वाकडी या छोट्याशा गावात राहणारे काळे दाम्पत्य शेती करतात. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत, असा परिवार आहे. आमच्या घरात गेल्या अनेक वर्षांपासून लहान थोर एकादशीचा उपवास करतात. आम्ही देवगड संस्थांनच्या दिंडीतून पायी वारी करतो, असे मानाच्या वारकऱ्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!