
मुंबई:- माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीच्या हप्ता वसुलीचे आरोप लावून एकच खळबळ उडवून दिली होती.त्यानंतर अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला होता.अशातच ईडीने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करत त्यांना चौकशीसाठी अटक केली होती. त्यानंतर देशमुखांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
मात्र,आता ईडी अनिल देशमुख यांच्या विरोधात या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र असेल. दुसरे आरोपपत्र पोलीस अधिक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या, आयपीएस आणि राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबत होणाऱ्या देवाणघेवाण प्रकरणाशी संबंधित आहे. याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास १२ एसपी स्तरावरील अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. ज्यात आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शिफारशीवरून या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचा संशय आहे. ज्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यात डीसीपी ट्रॅफिक पुणे राहुल श्रीरामे, एसपी जी श्रीधर यांचा समावेश आहे. यापूर्वीच ७ डिसेंबर रोजी, महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची चौकशी झाली. दोन समन्स पाठवण्यात आल्यानंतर ते ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाले होते. ३० नोव्हेंबर रोजी ते मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आणि त्याच दिवशी त्यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. तसेच शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा देखील याप्रकरणी ईडीने जबाब नोंदवला आहे.