मुंबईमहाराष्ट्र

ईव्हीएमविरोधी आंदोलन : शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपतींना पाठवली दहा हजार पोस्टकार्ड

ठाणे – ईव्हीएम हटाओ… लोकशाही बचाओ असा नारा देत विधिमंडळ गटनेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सामान्य नागरिकांची सुमारे दहा हजार पोस्टकार्ड पाठविली. गेल्या काही निवडणुकांचा धांडोळा घेतल्यास ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएममधील मतदान यामध्ये तफावत असल्याचीही काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. ही बाब गंभीर असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारी आहेत, असा आरोप करून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

या ठिकाणी कोरे पोस्टकार्ड ठेवून ईव्हीएम घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच, नागरिकांना आवाहन करून राष्ट्रपतींना पत्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. ” सामान्य भारतीय नागरिकांच्या मनात ईव्हीएमबाबत संशय अधिकाधिक गडद होत असल्याने भावी काळात लोक मतदानापासून दूर जाण्याची शक्यता असल्याने ईव्हीएमवर बंदी आणून जगभरात ज्या पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान घेतले जात आहे. त्याच पद्धतीने भारतात मतपत्रिकेचा वापर करावा”, अशा आशयाचा मजकूर या पोस्टकार्डवर लिहिण्यात आला होता. ही सर्व पोस्टकार्ड मुख्य डाक कार्यालयातील पत्रपेटीमध्ये डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनीच टाकली.

या वेळेस डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, इव्हीएम हॅक केले असा आमचा आरोप नाही. मात्र, इव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली, असे आमचे मत आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत. 17 सी चा फाॅर्म आणि झालेले मतदान यांची आकडेवारी जर जुळत नसेल तर नक्कीच काही तरी घोटाळा आहे. पाच वाजता 52% मतदान होते. नंतर ते 65-68% टक्के झाले. ही आकडेवारी कशी वाढली? एकदम 13% वाढ म्हणजे झालेल्या मतदानाच्या एक चतुर्थांश मतदान अवघ्या तासाभरात होऊ शकते का? ही वाढ कुठून झाली? यावर निवडणूक आयोग काहीही बोलायला तयार नाही. टाकलेली मते आणि मोजलेली मते यामध्ये यामध्ये फरक येतोय. इव्हीएममध्ये जर संगणकप्रणाली वापरली जात असेल तर मतदानाची टक्केवारी काढण्यासाठी असे कुठले मोठे राॅकेट सायन्स आणावे लागतेय. हा सगळा कुणाच्या तरी आदेशावरून झालेला घोळ आहे. त्यामुळेच आता जनआंदोलन सबंध भारतभर उभे राहिल. कारण, जर असेच घडत राहिले तर या देशाची लोकशाही संपुष्टात येईल. म्हणूनच आम्ही राष्ट्रपतींना हजारो नागरिकांची पत्रे पाठविली असून बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची विनंती केली आहे. जर अमेरिकेतील मतमोजणी अडीच दिवस चालत असेल तर आपल्याकडे काय अडचण आहे. लोकशाहीत मतदान प्रक्रिया ही पारदर्शी असली पाहिजे. मी टाकलेले मत कुठे गेले आहे, हे.मला कळलेच पाहिजे. त्यासाठीच आम्ही आता राष्ट्रपतींना विनंती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!