अर्जुना आणि खारेपाटणचे पूल पूर्णत्वास; स्ट्रक्चरल ऑडीट झाल्यानंतर लवकरच हे पूल होणार वाहतुकीस खुले

मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक वर्षे रखडलेले शुक नदीवरील खारेपाटण पूल आणि अर्जुना नदीवरील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. स्ट्रक्चरल ऑडीट झाल्यानंतर लवकरच हे पूल वाहतुकीस खुले होणार असल्याची माहिती केसीसी बिल्डकॉनकडून देण्यात आली.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू होण्यापूर्वी कोकणातील १४ पुलांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मे २०१४ मध्ये झाला होता.
यातील राजापूर येथील अर्जुना नदीवरील पूल आणि शुकनदीवरील खारेपाटण पुलाचे काम सात वर्षापासून रेंगाळले होते. ठेकेदाराने अपूर्ण बांधकाम करून काम सोडून दिले होते. अखेर सन २०२० मध्ये या पुलांची कामे चौपदरीकरणाचे काम करणार्या केसीसी बिल्डकॉन कंपनीकडे सुपुर्द करण्यात आली.
सध्या या पुलाची कामे पूर्ण झाली असून पुढील दोन ते तीन आठवडे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट होणार आहे. त्यानंतर हे पुल वाहतुकीस खुले होणार आहेत.या पुलांमुळे मुंबई-गोवा एक्सप्रेस वे वरील वाहतूक सुलभ होणार आहे.