काँग्रेस पक्षाने नेहरु गांधी परिवाराच्या जोखडातून बाहेर येण्याची गरज ! -योगेश वसंत त्रिवेदी

विदर्भातील एकेकाळचे जबरदस्त नेते, माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांचे पिताश्री सतीश चतुर्वेदी यांनी काही वर्षापूर्वी आम्हा काही पत्रकारांबरोबर गप्पा मारतांना काँग्रेस पक्षाची परिस्थिती सांगितली होती. महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्ताने आम्ही नागपूर येथे गेलो असतांना शनिवार रविवारी नागपूरच्या बाहेर जाण्याचा एक प्रघात आहे. अशाच एका दौऱ्यावर सतीश चतुर्वेदी यांच्या समवेत गप्पा रंगल्या होत्या. तेंव्हा राहुल गांधी एवढे प्रकाशात नव्हते आणि सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व होते. त्यावेळी सतीश चतुर्वेदी म्हणाले, पंडितजी ! अरे, यह सोनिया गांधी के प्रती हमारा इतना लगाव है इसलिये हमनें उन्हें नेतृत्व सौंपनेका निर्णय नहीं लिया है, यह तो डूबते को तिनकेका सहारा है, इसलिये हमने उन्हें नेतृत्व करनेको कहा हैं. नहीं तो हमारे लोग आपसमें लडतेही बैठेंगे. सतीश चतुर्वेदी यांचे हे वाक्य साधारण पंधरा वीस वर्षानंतर सुद्धा खरे ठरत आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना सर एलन ह्यूम यांनी २८ डिसेंबर १८८५ रोजी केली. मादाम कामा आणि दादाभाई नौरोजी हेही या संस्थापकांपैकी होते. पाहता पाहता काँग्रेस पक्षाचा चेहरा मोहरा बदलू लागला. महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ऐवजी पंडित जवाहरलाल नेहरु या आपल्या आवडत्या अनुयायाच्या हाती १५ ऑगस्ट १९४७ रोजी फाळणीनंतरच्या भारताचे नेतृत्व सुपूर्द केले. त्यानंतर लालबहादूर शास्त्री, गुलजारीलाल नंदा, पामलू वेंकट नरसिंह राव अशा काही नेत्यांचा अपवाद वगळता पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पुनश्च सोनिया गांधी यांच्या हाती काँग्रेसचे नेतृत्व राहिले. म्हणजे केवळ नेहरु गांधी या परिवाराभोवतीच या एकशेतीस वर्षाच्या परंपरेच्या म्हणवल्या जाणाऱ्या पक्षाचे नेतृत्व फिरत राहिले.

मुळात सर एलन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि मादाम कामा यांनी स्थापन केलेला हा मूळ काँग्रेस पक्ष तोच आहे काय ? हा खरा प्रश्न आहे. कारण बंगलोरच्या काचघरात १९६९ साली इंडिकेट आणि सिंडिकेट म्हणजेच इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्या गटात विभागलेले दोन पक्ष झाले होते. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९७१ च्या बांगलादेश निर्मितीच्या वेळी जे युद्ध झाले होते आणि त्या युद्धानंतर ‘अनभिषिक्त सम्राज्ञी’ म्हणून इंदिरा गांधी पुढे आल्या होत्या. त्यांनी २६ जून १९७५ रोजी आणिबाणी लादली आणि आपल्या हाती सत्ता केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. पण लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभूतपूर्व अशा लोकचळवळीमुळे १९७७ साली प्रचंड राजकीय उलथापालथ होऊन जनता पक्ष भारताच्या राजकीय क्षितिजावर उदयाला आला. त्यावेळी भारतीय जनसंघ, संघटना काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि भारतीय लोकदल या चार पक्षांचे जनता पक्षात विलिनीकरण करण्यात आले. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली असलेली संघटना काँग्रेस जनता पक्षात विलीन झाली. म्हणजे एक काँग्रेस संपली. मग जी संपली ती खरी काँग्रेस नव्हती कां ? की इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असलेली काँग्रेस खरी काँग्रेस होती. त्यानंतर सुद्धा काँग्रेस पक्षाचे विविध प्रकारचे गट तयार झाले. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, के. ब्रह्मानंद रेड्डी, शरद पवार, शंकरराव चव्हाण, ममता बॅनर्जी अशा अनेक वेगवेगळ्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार काँग्रेस या नांवाचा उपयोग करून घेतला, वापर केला. अर्थात, असे जरी असले तरी इंदिरा गांधी यांच्या वारसागत पुढे आलेल्या राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे खरी काँग्रेस म्हणून नांव घेण्यात येत आहे. परंतु इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला मिळालेली लोकसभेतील सर्वोच्च संख्या पुढे टिकविणे शक्य झाले नाही. नरेंद्र मोदी यांच्या राजकीय झंझावातामुळे तर काँग्रेस पक्षाची २०१४ आणि २०१९ मध्ये इतकी वाताहात झाली की नियमाप्रमाणे लोकसभेत अधिकृत विरोधी पक्ष नेतेपदासाठी आवश्यक ती संख्या सुद्धा गाठता आली नाही. परिणामी लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून नियमानुसार मिळणाऱ्या राजकीय सुविधा सुद्धा काँग्रेस पक्ष प्राप्त करवून घेऊ शकला नाही. इंदिरा गांधी यांच्या काळात पक्षाने स्वीकारलेली ध्येय धोरणे सोनिया राहुल यांच्या काळात पुढे स्वीकारु शकला नाही. सर्वच राजकीय पक्षांना लागलेला निष्ठावंतांना डावलण्याचा रोग याही ऐतिहासिक वारसा म्हणविणाऱ्या पक्षाला जडला. राजाश्रय आणि लोकाश्रय असे प्रकार याही पक्षात पुढे बळावले. आरत्या ओवाळणाऱ्यांना पदांची खैरात वाटण्यात येऊ लागली आणि पक्षहिताच्या परखड भूमिका घेणाऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता पदरी पडू लागल्या. ज्या २३ नेत्यांनी नेतृत्वाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न केला त्यांना खड्यासारखे बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रीय पातळीवर पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. नाही म्हणायला महाराष्ट्रात राजकीय समीकरण बदलल्यामुळे आणि शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या रचनेमुळे काँग्रेस पक्षाला स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी ठरले. पण काही बोलघेवड्या नेत्यांमुळे महाराष्ट्रात हा पक्ष अजूनही अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. रोज वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्यांमुळे पक्षाची विश्वासार्हता संपते की काय ? असे प्रश्न निर्माण होत आहेत. वेगवेगळे पदाधिकारी प्रसिद्धीसाठी वाट्टेल तशी विधाने करतांना दिसत आहेत तर ज्यांनी बोलायला हवे ते तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा, अशा मनःस्थितीत आहेत. काँग्रेस पक्षात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील यांसारखे नेते अजूनही पक्षाला योग्य दिशा आणि योग्य नेतृत्व देऊ शकतात. पण त्यांच्या कडे लक्ष देण्यात येत नाही. राष्ट्रीय पातळीवर अभिषेक मनू सिंघवी, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मनीष तिवारी असे अनेक नेते आहेत. सर्वच पदाधिकाऱ्यांनी देशाचे आणि पक्षाचे हित लक्षात घेऊन नेहरु गांधी परिवाराचे जोखड झुगारुन देऊन सामूहिक नेतृत्व स्वीकारण्याची आवश्यकता आहे. संसदीय लोकशाही मार्गाने आजवरची राजकीय पक्षांची वाटचाल लक्षात घेतली तर पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे त्या त्या काळात पक्षावर आणि सरकारवर नियंत्रण होते आणि आहे. परंतु भारतीय जनता पक्ष जरी कितीही डांगोरा पिटत असला तरीही आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंतप्रधानांना आदेश देऊ शकत नाहीत तसेच प्रदेशाध्यक्ष नेत्यांना निर्देश देऊ शकत नाहीत. राजशिष्टाचार लक्षात घेतला तरी दुर्दैवाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांना द्यायला हवे तेवढे महत्त्व देण्यात येत नाही. नकळत का होईना त्यांचा जाहीरपणे पाणउतारा झालेला पहायला मिळतो. काँग्रेस पक्ष म्हणून जर राष्ट्रीय पातळीवर विचार करायचा झाला तर सोनिया गांधी यांना वयाच्या मानाने तसेच प्रकृतीच्या कारणाने आता काही मर्यादा आहेत तर राहुल गांधी यांना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी जे करायची गरज आहे तेवढा त्यांचा वकूब नाही, हे दुर्दैवाने म्हणावे लागते. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून पक्षाला, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भावना आणि वस्तुस्थिती यातून भावनेला बाजूला ठेवून वस्तुस्थितीचा स्वीकार करुन वाटचाल करावी लागेल. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’, अशी साद घालून पक्षापासून दुरावलेल्या, लांब गेलेल्या परिवार निष्ठांऐवजी पक्षनिष्ठेला प्राधान्य देणाऱ्या आणि देशहित सर्वोच्च मानणाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु झाला आहे. दादाभाई नौरोजी, मादाम कामा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरु, पंडित मदनमोहन मालवीय, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, पांडुरंग सदाशिव साने उर्फ सानेगुरुजी, शंकरराव देव, एम. एन. रॉय, युसुफ मेहेर अली, नरहरी गाडगीळ, विठ्ठलराव गाडगीळ, पुरुषोत्तम दास टंडन, गोविंद वल्लभ पंत, खान अब्दुल गफ्फारखान, सरोजिनी नायडू अशा दिग्गज महानुभाव व्यक्तींनी धुरा वाहिलेल्या काँग्रेस पक्षाला चांगल्या पद्धतीने पुढे आणण्यासाठी नव्या नेतृत्वाने काम करण्याची गरज आहे. १९३६ साली जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे काँग्रेस पक्षाचे अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनाची जबाबदारी धनाजी नाना चौधरी यांनी सांभाळली होती. त्या अधिवेशनाचा अमृतमहोत्सव काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव धनाजी उर्फ बाळासाहेब चौधरी यांचे चिरंजीव आमदार शिरीषभाऊ मधुकरराव चौधरी यांनी आठवणीने साजरा केला. ही अमृतमहोत्सवी परंपरा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाशी सांगड घालून पक्ष आणि पर्यायाने देश तसेच देशातील संसदीय लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

(योगेश वसंत त्रिवेदी)

[email protected]/ 989293532

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!