महाराष्ट्र

हे महामानवा, आम्हाला माफ करा !

By-योगेश त्रिवेदी, ज्येष्ठ पत्रकार

हे महामानवा ! प्रजासत्ताक भारताच्या घटनेच्या शिल्पकारा !! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खरोखरच आम्हाला माफ करा !!! आसेतु हिमाचल एक आणि अखंड असलेल्या भारत वर्षावर दीडशे वर्ष फिरंग्यांनी राज्य केलं आणि आमच्या मनामनात दुहीची बीजं रोवली/पेरली. आमच्या देशाचे हिंदुस्तान, पाकिस्तान असे तुकडे केले आणि मग बांगला देशही जो आधी पूर्व पाकिस्तान होता तो वेगळा झाला. आमच्यात फूट पाडण्यात फिरंगी, इंग्रज यशस्वी झाले. भारत स्वतंत्र होऊन 74 वर्ष झाली, अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश करु. पण आमच्यात दुहीची बीजं अजूनही कायम आहेत. भले आम्ही एकविसाव्या शतकात पोहोचलो असलो तरी आमच्यात ती बीजं अजूनही डोकावतच असतात. दुहीचा आम्हाला शापच आहे. कितीही काही झाले तरी आम्ही आमची मानसिकताच बदलायला तयार नाही.

    बाबासाहेब, भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि आपण राज्यघटना तयार केली. 26 जानेवारी 1950 ला भारत प्रजासत्ताक झाला. आपण आम्हाला दिशा दिलीत. आपण पुढारलेले आणि मागासवर्गीय यांना एका पातळीवर आणण्यासाठी, सवर्ण आणि दलित यांना एका प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेत दहा वर्षासाठीची मुदत घालून दिलीत. 1950 ला आपण लिहून ठेवलंत की 10 वर्षापर्यंतच आरक्षण ठेवा. पण प्रत्येक 10 वर्षानंतर ते वाढवणे, आपण दाखवून दिलेली मुदत वाढवून घेणे आमची राजकीय मजबूरी झाली आहे. आरक्षण म्हणजे आम्हाला एक मिळालेली मोठी मतपेटी आम्ही समजू लागलो. आज देशात आरक्षणाच्या नावाखाली अराजक माजतं की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

    बाबासाहेब, आपण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सांगून गेलात. पण आम्ही त्यातले काहीही घेऊन शकलो नाही. ना शिकलो, ना संघटीत झालो, ना आमच्यावरील अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला. फक्त मतांच्या राजकारणासाठी एकमेकांची डोकी फोडण्यासाठी पुढे हातात दगड घेऊन तो भिरकावण्यासाठी सरसावलो. मी म्हटले की, बाबासाहेब शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा असं सांगून गेले. त्यातला फक्त संघर्ष करा एवढंच आम्ही मनात ठेवलं तर  माझी कन्या प्रा. सौ. नयना म्हणाली, अहो बाबा, याला आपण संघर्ष तरी कसं म्हणणार? ही तर निव्वळ भांडणं. संघर्ष हा अन्यायासाठी असतो नां? खरंय नयनाचं म्हणणं.

    आज आधुनिक तंत्रज्ञान झपाट्याने वाढले आहे. धीरुभाई अंबानी म्हणाले, कर लो दुनिया मुठ्ठी में. आम्ही एका क्लिकवर जग मुठीत घेण्यासाठी सरसावलो. पण छे, हे तर निव्वळ आधुनिकतेचे बुडबुडेच. अजुनही आम्ही बुरसटलेल्यासारखेच वागतो? आज आम्हाला सोशल मीडिया, समाजमाध्यमाचं शस्त्र मिळालंय. हे शस्त्र दुधारी असल्याचं आम्हाला कळलंच नाही. या सोशल मिडियाच्या दुधारी शस्त्राने आम्ही एकमेकांच्या माना कापायला पुढे निघालोय. दुही वाढवण्यासाठी त्याचा उपयोग  करु लागलोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी चारशे वर्षापूर्वी लढा दिला. गड किल्ले बांधले. आमच्या नैसर्गिक संपत्तीत भर घातली. आम्हाला युध्दनीति, गनिमी कावा शिकविला. आपल्या मावळ्यांमध्ये सर्व प्रकारचे जाती पातीचे लोक खांद्याला खांदा लाऊन मुघलांच्या साम्राज्याशी लढले. पण त्याच छत्रपतींचा आणि बाबासाहेब, आपलाही आम्ही फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठीच उपयोग करुन घेत आहोत, नव्हे ते करण्यासाठीच धडपडतो आहोत. ज्या शिवरायांची किर्ती विश्वात झाली. ज्या शिवरायांचा आदर्श साता समुद्रापार गेला. अटकेपार त्यागाचा, शौर्याचा भगवा फडकवला त्या शिवाजी राजांना आम्ही `मराठे’ एवढ्यापुरते सीमित करुन ठेवून मागासवर्गीय आरक्षणाच्या चौकटीत बंदिस्त करण्यासाठी धजावलो आहोत ? बाबासाहेब, आपण भारतरत्न आहात, आपण विश्वरत्न आाहात. पण आम्ही आपल्यालाही केवळ दलितांचे म्हणून संकुचित करायला धजावलो आहोत? महात्मा जोतिबा फुले यांना आम्ही केवळ एकाच समाजापुरते सीमित ठेवणार आहोत ? जळगांव येथे जैन इरिगेशन चे भंवरलाल जैन यांनी गांधीतीर्थ उभारले आहे. आम्ही मंत्रालयातल्या पत्रकारांनी तिथे भेट दिली. भंवरलाल हे जैन. त्यांनी तीर्थंकर भगवान महावीर यांचे जिनालय किंवा देरासर उभारण्याऐवजी महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘गांधी तीर्थ’ उभारतांना गांधीजींनी वैश्विक पातळीवर आपली छाप उमटविली असल्याने त्यांच्या नांवाने उभारण्यात आलेल्या वास्तूला भेट देण्यासाठी संपूर्ण जगातील लोक येतील ही अपेक्षा बाळगली होती. त्यांनी स्वतः ही भूमिका आमच्या बरोबर बोलतांना विस्तृत पणे मांडली होती. हा एक अपवाद म्हणावा लागेल. एरव्ही सारे राष्ट्रपुरुष त्यांच्या त्यांच्या जाती धर्मात बंदिस्त करुन ठेवण्यात धन्यता मानली.
    एक जानेवारी 1818 रोजी ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य पुण्यावर चाल करुन आले आणि त्यांचा मुकाबला पेशव्यांच्या 28000 सैनिकांशी होऊन 500/800 महार सैनिकांनी कोरेगाव भिमा तीरावर रोखले त्या सैन्याला परास्त केले आणि 75 फूट उंच विजयस्तंभ कोरेगावला उभारला. त्या 200 वर्षापूर्वीच्या विजयस्तंभाला अभिवादन प्रत्येक एक जानेवारीला करायला असंख्य, हजारो, लाखो लोक येतात. मग  1 जानेवारी 2018 रोजी तब्बल दोनशे वर्षानंतर हिंसाचार का व्हावा? आम्ही काहीही करु शकतो. अगदी म्यानमारला खुट्ट झाले तरी आम्ही भारतात मोर्चे काढू शकतो. कोरेगावला काय झालं याची काहीही माहिती नसलेल्यांनी 200 हून अधिक बसेस जाळल्या ? कोरेगांवला स्थानिक लोक काय म्हणतात हे विचारण्यापेक्षा, त्यांच्याकडे जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्यापेक्षा आम्ही मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर पासून तर थेट गुजरात, नवी दिल्ली, मध्यप्रदेश या सर्वत्र ठिकाणी आगी लावल्या ? नाही, बाबासाहेब, आम्ही आपले विचार तंतोतंत अंमलात आणण्याच्या लायकीचेच नाहीत.
    बाबासाहेब, तुम्हाला आठवतंय? 1995 ते 1999 या काळात डॉ. मनोहर गजानन जोशी आणि गोपीनाथराव पांडुरंगराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले सरकार सुरु होते आणि त्यावेळी शिवशाही सरकारला रमाबाई नगरातल्या घटनेने गालबोट लावण्याचा प्रकार घडला. आठवतंय का बाबासाहेब ?  तीच इतिहासाची पुनरावृत्ती 2018 मध्ये घडली असे आपणास वाटत  नाही का?  सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा जाती पातीच्या राजकारणाचा सहारा घेतला जातोय.
    बाबासाहेब, तुम्ही जाणताच ना? काँग्रेसवाल्यांनी तुम्हाला किती त्रास दिला. अगदी लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यातही काँग्रेस वाल्यांनी कसूर केली का? 10 वर्ष केंद्रात आणि 15 वर्ष राज्यात सत्तेवर असतांना काँग्रेसी राज्यकर्त्यांनी साधी आपल्या भव्य स्मारकासाठी इंदु मिलची जागाही हस्तांतरीत करण्याचे काम यशस्वी केले नाही. बाबासाहेब, आपण ज्या ठिकाणी लंडनला  उच्च शिक्षणासाठी रहात होतात, ते घर सुध्दा मनमोहन – चव्हाण राजवटीत आपल्या ताब्यात ….. येऊ शकले नाही. शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुती सरकारने लंडनचे घर असो, इंदू मिलची जागा व त्यावरचे स्मारक असो, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असो, महू येथील आपली जन्मभूमि असो, रत्नागिरीची वास्तु असो की संविधान दिवस असो, आपल्याशी संबंधित अशा सर्व गोष्टी  महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने मार्गी लावल्यात ना? अगदी 11 ऑक्टोबर 2015 रोजी बाबासाहेब आपल्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या दिवशी इंदु मिलच्या जागेवर आपले `शागीर्द’ म्हणवणारे, कपाळी आपले कुंकू लावणारे (पण समाज एकसंघ बांधण्यात निष्फळ ठरलेले) पुढे असणारे तमाम नेते मोदी – फडणवीस यांच्या बाजूस उभे होते. एवढे सारं होत असतांना हे नेते का बरे राजकारण करताहेत. कोरेगांव भीमा येथे जाऊन शांतता प्रस्थापित करण्याऐवजी दुसऱ्याला खाली पहायला लावून आपले नेतृत्व सिध्द करण्याच्या धडपडीसाठी बंद का बरे पुकारताहेत? आपणासही हे आवडलं नसेल ना?  रामदास आठवले हे आपल्यानंतर केंद्राच्या मंत्रीमंडळात जाणारा पहिला रिपब्लिकन नेता, पण त्याला साथ देण्याऐवजी त्यांचे पाय ओढण्याचा प्रयत्न ?
    बाबासाहेब, ही आपली शिकवण तर नव्हती ना? सकाळी शाहू, फुले, आंबडकरांची जपमाळ ओढणारे संध्याकाळी आपटे आगाशे, डहाणूकरांची जपमाळ ओढत असल्याचा आरोप सुध्दा करण्यात येतो नां? पण त्याचं काहीच कसं वाटत नाही?  बाबासाहेब, आपल्याला विश्वरत्नचा बहुमान प्रत्येक जण बोलण्यातून देत असतो पण आपल्याला सर्वोच्च असा भारतरत्न किताब देण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाठींब्यावरच्या विश्वनाथ प्रतापसिंह यांना पुढे यावं लागलं. तेही प्रा. अरुण कांबळे या मुंबई विद्यापीठामधल्या मराठी भाषा विभाग प्रमुखाने लिहिलेल्या पत्रामुळे.  एका घरात तीन तीन भारतरत्ने गेली. त्याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचं नाही पण आपल्या सारख्या महामानवास भारतरत्न देण्याची इच्छाही काँग्रेसच्या राज्यकर्त्यांना होऊ नये? आपल्या नावाचा केवळ मतांच्या राजकारणासाठी आणि आपल्याच स्वार्थी पोळीवर सत्तेचं तूप ओढून घेण्यासाठी काँग्रेसवाले सदैव धडपडताहेत आणि त्यांना तुमचे अनुयायी म्हणवणारे साथ देताहेत. खरंय नां बाबासाहेब? बाबासाहेब, खरंच आम्हाला माफ करा! तुम्ही आमच्यासाठी एवढं सर्व करुन गेलात पण तुमच्या विचारांवर न चालता फक्त आम्ही एकमेकांची माथी भडकावण्याचेच काम करतो आहोत, बाबासाहेब आम्हाला माफ करा.
    भीमा-कोरेगांवच्या घटनेनंतर समाज माध्यमात एक एक संदेश फिरताहेत ते डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत. अर्जून भालेराव यांनी पाठवलेला संदेश काय आहे. वॉट्सअपवर पाठवलेल्या संदेशात म्हटलंय,’ मी अजूनही त्या दिवसाची वाट बघतोय. जेंव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान अचानक घोषित करतील की आज रात्री बारा पासून भारतात कोणतीच जात किंवा कोणताही धर्म अस्तित्त्वात राहणार नाही. आठ दिवसांची मुदत देऊन जुन्या जाती धर्म बदलून नवीन जात ‘माणूस’ आणि नवीन धर्म ‘मानवता’ म्हणून सर्वांना बंधनकारक असेल. असे झाले तरच हा आपला ‘देश’ जगावर राज्य करेल. कारण ‘कॅशलेश’ पेक्षा आपला देश ‘कास्टलेस’ झाला झाला पाहिजे.
शोभा वाजपेयी यांनी पाठवलेला संदेश काय सांगतो?
I crossed my street, they asked my caste.
I crossed my district,  they asked my religion.
I crossed my state, they asked my language.
I became Indian only after I crossed my country..!  मी जेंव्हा रस्ता ओलांडते तेंव्हा मला माझी जात विचारली जाते, मी माझा जिल्हा ओलांडते तेंव्हा माझा धर्म विचारला जातो, मी जेंव्हा माझे राज्य ओलांडते तेंव्हा माझी भाषा विचारली जाते परंतु मी भारतीय असल्याचे फक्त माझा देश ओलांडते तेंव्हा समोर येते.
A silent, but very strong message….think about it.. अत्यंत छोटा परंतु मजबूत संदेश आहे, याचाच विचार होणे आवश्यक आहे.
    गुजराती साहित्यिक धर्मेश भट्ट म्हणतात, ‘ना ब्राह्मण जिंकले ना मराठा ना दलित… जिंकले फक्त इंग्रज! 200 वर्षानंतरही फूट पाडण्यात यशस्वी.असाच एक संदेश फिरतोय की विश्व 2018 मध्ये प्रवेश करत असतांना महाराष्ट्र मात्र 1818 मध्ये प्रवेश करता झाला.
    ही तर बाबासाहेब, काही प्रातिनिधिक आहेत पण समाजा समाजात तेढ लावून एकमेकांची डोकी फोडण्यामुळे आम्ही खरोखरच बाबासाहेब, आपल्या स्वप्नातला भारत घडवणार आहोत का? आपण राज्यघटना देऊन भारताला प्रजासत्ताक होऊन 71 वर्ष झाली पण आम्ही शिकलो नाही. बाबासाहेब आम्हाला माफ करा. महान शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांनी 2020 साली विकसित भारत हे स्वप्न पाहिले होते. आम्ही अजूनही प्रयत्न केले आणि ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूत्र अंमलात आणले तरी भारत महासत्ता होण्यास हरकत काहीच नाही, हे बाबासाहेब आपण जाणता.
    पण जा जा म्हणून सुध्दा जी ‘जात’ नाही ती ‘जात’, हीच ‘जात’ आडवी येते. बाबासाहेब आपल्या अनुयायांसह सर्वांना जात -पात-धर्म-पंथ विरहित समाज घडविण्याची सुबुध्दी मिळो हीच आज अपेक्षा व्यक्त करतो आणि आजपर्यंत आम्ही काही घडवू शकलो नाही म्हणून म्हणतो, बाबासाहेब आम्हाला माफ करा!
             -योगेश वसंत त्रिवेदी, 9892935321.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!