भारतातील प्रत्येक नागरिकाला मार्गदर्शक आणि बंधनकारक असणारी भारतीय राज्यघटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ एका विशिष्ट धर्माशी,जातीशी निगडीत आहेत असा संकुचित विचार केला जातो ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. भारतातील महान नेत्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणारे निर्भीड पत्रकार व व्यासंगी लेखक आचार्य अत्रे म्हणतात,
“महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने व्यासंगाने आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आणि पवित्र ब्राह्मण आहे. एवढेच नव्हे तर ” महर्षी ” ह्या श्रेष्ठ पदवीपर्यंत तो जाऊन पोहोचला आहे.ज्या कोणा सनातनी ब्राह्मणाला आपल्या जन्मजात ब्राह्मण्याची घमेंड असेल तर त्याने ह्या कर्मजात ” ब्राह्मणाच्या ” घरात जाऊन त्याचे शुचिर्भूत ,सोज्ज्वळ आणि ज्ञानमय जीवन पहावे म्हणजे श्रीमुखात बसल्यासारखा चेहरा करून नाही तो
बाहेर पडला तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू “
आचार्य अत्रेंना डॉक्टर बाबासाहेबांशी अनेकदा प्रत्यक्ष बातचीत करण्याचे भाग्य लाभले होते.त्यांनी म्हटले होते. “अमेरिका आणि रशिया यांच्याशी स्पर्धा करण्याइतके सामर्थ्य या देशाच्या अंगी यावे असे आपल्याला जर वाटत असेल तर आपण ह्या देशाच्या भवितव्याची सूत्रे पंडित जवाहरलाल नेहरू सारख्या आणि बाबासाहेब आंबेडकर सारख्या अद्वितीय बुद्धिमत्तेच्या , मुत्सुद्यांच्या हातात सोपविली पाहिजेत . “
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमानाचा एक ज्वलंत ज्वालामुखी .१४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील माहु गावी बाबासाहेबांचा जन्म झाला . भीमराव हे चौदावे
अपत्य.त्यांचे वडील सुभेदार रामजी पालोजी आंबेडकर इस्ट इंडिया कंपनीच्या सरकारातील सैन्यात होते. सैनिकांच्या मुलामुलींच्या असलेल्या शाळेत ते हेडमास्तर असल्याने विद्याव्यासंगी होते. साहजिकच छोट्या भिवाकडून त्यांनी लहानपणी रामायण – महाभारत ग्रंथांचे पारायण करून घेतले होते बाबासाहेब इंग्रजी शिक्षणासाठी सातारा हायस्कूल मध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी मध्ये इंग्रजी पहिलीत दाखल झाले .हाच दिवस आता आपण ‘ विद्यार्थी दिवस ” म्हणून साजरा करतो.
१९०७ साली Matric परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी १९१२ साली एल्फिन्स्टन कॉलेज मधून बी.ए. ची पदवी संपादन केली. २ फेब्रुवारी १९१३ रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले.त्यांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांच्या सांभाळ त्यांच्या आत्यानी केला होता बडोदा संस्थांनचे राजे सयाजीराव गायकवाड ह्यांच्या शिष्यवृत्तीमुळे ( ११ . ५ डॉलर ) त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून पी. एचडी. पदवी संपादन केली .त्यानंतर काही काळ भारतात परत आल्यावर कोल्हापूरच्या महाराजांनी केलेल्या अर्थ सहाय्यामुळे त्यांनी लंडन येथे
जाऊन ” The Problem of the Rupee — Its Origin & its Solution ” हा प्रबंध सादर करून अर्थशास्त्रातील डी एससी पदवी संपादन केली .आपण घेतलेल्या अपार परिश्रमाबद्दल डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की मी बी .ए. होईपर्यंत अगदी सामान्य प्रतीचा विद्यार्थी होतो.पुढे माझ्या हातून काही संशोधन होईल अशी माझ्याबद्दल मलाही अपेक्षा नव्हती.माझ्यातील सुप्त गुणांचा विकास होण्याचे कार्य केले ते प्रा.सेलीग्मन यांनी.मी स्वतंत्रपणे विचार करू शकलो ते त्यांच्यामुळेच.
डॉक्टर बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली ती २० जुलै १९२४ रोजी स्थापन केलेल्या ” बहिष्कृत हितकारिणी सभा ” या संस्थेमुळे . तत्पूर्वी त्यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ” मूकनायक ” हे वृत्तपत्र सुरु केले. त्यानंतर डिसेंबर १९३० मध्ये ” जनता ” हे साप्ताहिक सुरु केले. १९४६ साली ” पिपल्स एजुकेशन सोसायटी ” ची स्थापना करून मुंबईत सिद्धार्थ कॉलेज आणि जून १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज सुरु केले.
डॉक्टर बाबासाहेबांचा जीवन संघर्षच मुळी अस्पृश्यता दूर करण्यासाठी होता. १९२७ सालचा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह हा त्याचाच एक मुख्य भाग होता . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ” आपल्या इतिहासात अस्पृश्यांचा स्पृश्य झाल्याचा एकही दाखला देता येत नाही.जन्मत: जो अस्पृश्य तो मरेपर्यंत अस्पृश्य . . दलित समाजाला मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात , ” आपली अस्पृश्यता आपणच घालविली पाहिजे . म्हणून आपण सबळ व निर्भय व्हावयास हवे. म्हणजेच ” शिका , संघटित व्हा , संघर्ष करा “.
दिनांक २५ ते २७ डिसेंबर १९२७ रोजी झालेल्या महाड परिषदेला पुरुषांच्या बरोबरीने दलित स्त्रियादेखील प्रचंड संख्येने उपस्थित बाबासाहेबांना समाधान वाटणे स्वाभाविक होते.त्यावेळी परिषदेच्या समारोपाच्या वेळी स्त्रियांना प्रबोधन करण्यासाठी ” अस्पृश्योन्नती आणि
स्त्रियांची जबाबदारी ” या विषयावर मार्गदर्शन करताना बाबासाहेब म्हणाले ” घर प्रपंच्याच्या अडचणी स्त्री व पुरुषांनी मिळून सोडविल्या पाहिजेत. फक्त एका पुरुषाने हे काम आपल्या अंगावर घेतले तर ते पार पाडण्यास त्यांना अवधी लागेल .पण तेच काम स्त्रियांनी जर
स्वत:कडे घेतले तर त्या कामात लवकर यश प्राप्त होईल. त्यांनी एकट्यानी ते काम अंगावर घेतले नाही तरी निदान त्यांनी पुरुषांना सहकार्य केल्याशिवाय राहू नये. यासाठी तुम्ही यापुढे नेहमी परिषदेस हजर राहिले पाहिजे. असे माझे तुम्हाला सांगणे आहे.खरे पाहिले तर अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न पुरुषांचा नसून तुम्हा स्त्रियांचाच आहे.
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे झालेल्या मुंबई इलाखा अस्पृश्य परिषदेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले , ” अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे.फक्त समानतेचे हक्क मिळतील
असाच धर्म त्यांनी स्वीकारावा. ” ते पुढे म्हणाले , दुर्दैवाने ” अस्पृश्य हिंदू ” असा डाग घेऊन मी जन्माला आलो. पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती.तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच .मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही .” १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यानिमित्ताने त्यांनी उपस्थितांना
बजावून सांगितले की ” आता तुमची जबाबदारी मोठी आहे. मान – सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे.म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. हे आपल्याया साधले तर आपण आपल्या बरोबर आपल्या देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू शकतो .”
डॉक्टर बाबासाहेब ब्राह्मणद्वेष्टे होते असे म्हणणाऱ्या मंडळीना खालील प्रसंग ज्ञात नसावा. महाडचा सत्याग्रह चालू असताना जेधे – जवळकर या ब्राह्मणेतर पक्षांच्या
नेते मंडळीनी सत्याग्रहाला पाठिंबा देताना एक अट घातली की अस्पृश्योद्धाराच्या चळवळीतून ब्राह्मण कार्यकर्त्यांना बाहेर काढावे . यावर भाष्य करताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, ” ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत.असे आम्ही समजतो. ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आम्हास जवळचा वाटतो. आमच्या सत्याग्रहात भाग घेण्यास कोणाही व्यक्तीस मोकळीक आहे.मग ती व्यक्ती कोणत्याही जातीतील असो . हे भांडण तत्वासाठी आहे. ते कोणत्याही एका व्यक्तीशी अथवा जातीशी नाही. “
पूर्वग्रहाचा काळा चष्मा डोळ्यांवरून काढून टाकल्याशिवाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रचंड बुद्धिमत्तेचे , विद्वत्तेचे , व कर्तुत्वाचे तेजस्वी दर्शन सर्वांना झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच बाबासाहेब आमचे-बाबासाहेब तुमचे असा संकुचित विचार न करता
बाबासाहेब सर्वांचेच असे म्हणणे भारतीय राज्यघटनेतील आदर्श नैतिक मूल्यांना धरून होईल.
जय भिम !
-प्रा.श्री. सुहास पटवर्धन ( ६९ )
एम.ए. ( इंग्रजी , १९७६ )
मुंबई विद्यापीठ
बदलापूर ( जिल्हा – ठाणे )
भ्रमणध्वनी — ९८९०५६९१०६

me.suhaspatwardhan@rediffmail. com (लेखक जीवनविद्या मिशन चे साधक तसेच बँकिंगच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)






