
मुंबई:कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईतील एनसीबीचा पंच आणि एनसीबीचा फर्जीवाडा प्रतिज्ञापत्राद्वारे उघड करणारा प्रभाकर साहिल याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आहे. मात्र या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असून राज्यसरकारने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीतील एनसीबीचा फर्जीवाडा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देशासमोर आणला होता. एनसीबीचा तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे कशा फर्जी कारवाई करतो हे पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेत सिद्ध केले होते त्यामुळे केंद्रीय एजन्सी असलेल्या एनसीबीची देशभर नाचक्की झाली होती असेही महेश तपासे म्हणाले.
समीर वानखेडे याच्या टीममध्ये फर्जी अधिकारी के. पी. गोसावी आणि इतर सहा जणांना नवाब मलिक यांनी समोर आणत त्यांचं भाजप कनेक्शन कसं आहे याचे पुरावे माध्यमांना पत्रकार परिषदेत देत एनसीबीची पोलखोल केली होती.
फर्जी अधिकारी के. पी. गोसावी याचा बॉडीगार्ड आणि ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साहिल याने नवाब मलिक यांनी फर्जीवाडा समोर आणल्यानंतर ही कारवाई कशी फर्जी होते हे समोर आणले होते. मात्र आज त्याचा अचानक हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे.
आर्यन खान प्रकरणात एनसीबीने परवाच कोर्टाकडे चार्जशीट दाखल करण्यासाठी ९० दिवसाची मुदत मागितली होती मात्र कोर्टाने ६० दिवसात चार्जशीट दाखल करा असे आदेश दिले होते आणि आज मुख्य साक्षीदाराचा मृत्यू होतो यामागे नक्कीच काहीतरी दडलं आहे त्यामुळे याची कसून चौकशी झाली पाहिजे असेही महेश तपासे म्हणाले.