पाच राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवणार

नवी दिल्ली-देशातील पाच राज्यांमध्ये कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून टाकला जाणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधानांचा फोटो हटवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविन प्लॅटफॉर्मवर लस प्रमाणपत्रातून मोदींचा फोटो काढून टाकण्यासाठी आवश्यक फिल्टर लावणार आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च या सात टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार या पाच राज्यांमध्ये कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून टाकला जाणार आहे.