विद्यार्थ्यांना भडकवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला अटक

मुंबई:- दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी काल मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.यामुळे मुंबईत विद्यार्थ्यांकडून बसच्या काचाही फोडण्यात आल्या.विद्यार्थ्यांचा वाढता रोष पाहता पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही केला.दरम्यान या विद्यार्थ्यांना भडकवल्या प्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला धारावी पोलिसांनी अटक केली आहे.
विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.आज सकाळी ११ वाजता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.दरम्यान हिंदुस्थानी भाऊच्या अटकेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे.
चार दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊने केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्याव्यात. शक्य झाले तर रद्द करा पण विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका. जर निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे व्हिडीओत हिंदुस्थान भाऊने म्हटले होते.याच व्हिडिओमुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे सांगत धारावी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक केली आहे.






