मोठी बातमी! नितेश राणेंना जामीन मंजूर

सिंधुदुर्ग:- शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना आज अखेर न्यायालयाने दिलासा दिला आहे. आज झालेल्या त्यांच्या जामीनावरील सुनावणीवर निकाल देत न्यायालयाने नितेश राणे यांना जामीन मंजूर केला आहे.
तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नितेश राणेंना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.याचसोबत नितेश राणे यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब यालाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान नितेश राणे यांना जामीन कधी मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं होतं. शनिवारी सरकारी वकील आणि तपास अधिकारी उपस्थित न राहिल्याने जामीनावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर रविवारी कोर्ट बंद असल्याने त्याही दिवशी सुनावणी झाली नाही. सोमवारी लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्यामुळे कोर्ट बंद होते. त्यानंतर काल कोर्टाने जामीनावरील निर्णय राखून ठेवला होता. मात्र,आज अखेर जामिनावर सुनावणी देत नितेश राणे यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.