बाळासाहेब थोरात : नवतरुण नेतृत्वाचा शोध घेणारा ‘रत्नपारखी’ !
योगेश वसंत त्रिवेदी

डॉ. मनमोहनसिंह सरकार तर्फे २००८ साली भारतातील शेतकऱ्यांना सत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. ही ‘ब्रेकिंग न्यूज’ आम्हाला महाराष्ट्राचे तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र गोविंदराव पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असतांना त्यांनी भारतातील शेतकऱ्यांसाठी सत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली.
ही कर्जमाफी जाहीर होण्यापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी ते महाराष्ट्राचे कृषिमंत्री असतांना आमच्या समवेत अनौपचारिक गप्पा मारतांना या कर्जमाफी चे सूतोवाच केले होते. मी, विलास तोकले, समीर मणियार, प्रकाश सावंत आणि सुयश पडते असे मंत्रालयातील पत्रकार ‘सेवासदन’ या बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी सहज म्हणून गप्पा मारायला गेलो होतो.
तेंव्हा त्यांनी आम्हाला सांगितले कीं, भारतातील शेतकऱ्यांसाठी लवकरच दिलासा देणारी घोषणा करण्यात येणार आहे. आणि ‘ती’ सत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. बाळासाहेब थोरात हे अत्यंत मितभाषी, मनमिळावू आणि संयमी नेते सलग आठ वेळा संगमनेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. याचा अर्थ त्यांची या भागातील लोकप्रियता दिसून येते.
भाऊसाहेब संतूजी थोरात यांचा वारसा त्यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने चालविला आहे. विजय भाऊसाहेब थोरात म्हणजेच बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल विविध प्रकारचे लेख, पुरवण्या प्रसिद्ध झाल्या आणि होतील. परंतु आजचा माझा मुद्दा आहे तो नवतरुण नेतृत्वाचा शोध घेणारा ‘रत्नपारखी’ कोण ? तर बाळासाहेब थोरात. मला वाटतं की ‘बाळासाहेब’ या नावाची माणसंच हे काम लीलया करु शकतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात आपल्याला हे विधान तंतोतंत पटते.
सुधीर जोशी यांना सर्वात तरुण महापौर बनविण्याची किमया केली ती बाळासाहेब ठाकरे यांनी. अनेकांना बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे आणून त्यांच्या कार्य कर्तृत्वाला झळाळी दिली. अनेक दगडांना शेंदूर फासून देव बनविले. याची यादी फार मोठी आहे. अर्थात त्यातले अनेक जण स्वतःला असामान्य समजू लागले. असो. पण बाळासाहेब थोरात यांनी नवतरुण नेतृत्व शोधण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या, त्या पाहता बाळासाहेब थोरात यांच्या ‘व्यवस्थापन कौशल्या’चे दर्शन घडते.
२०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या पारड्यात भरभरुन मतदान पडले. परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या अडेलतट्टूपणामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बरोबर फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर महाराष्ट्र विकास आघाडी बनविण्याचा निर्णय घेतला.
ऑक्टोबर २०१९ मध्ये निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तब्बल एक महिना सरकार स्थापनेचा घोळ सुरु होता. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. सुरुवातीला दोन्ही काँग्रेसचे नेते ‘थांबा आणि वाट पहा’ या भूमिकेत होते. आकड्यांची जुळवाजुळव होत नव्हती. पण उद्धव ठाकरे यांनी हा तिढा सोडविला. सारा घटनाक्रम घडत घडत २२ नोव्हेंबर २०१९ रोजी वरळीच्या नेहरू सेंटर मध्ये झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनविण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला.
हे सरकार बनविण्यात बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत समर्पक भूमिका बजावली. काँग्रेस पक्षाच्या काही आक्रस्ताळी नेत्यांना दूर ठेवीत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबरोबर चर्चा करुन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा केला. ओघानेच बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात वरच्या क्रमांकावर येणार हे निश्चित होते. आणि झाले ही तसेच. बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येणे हा एक प्रयोगच म्हणावा लागेल.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे १९९९ साली वेगवेगळे झाले तरी ते एकत्रच आहेत. परंतु शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस एकत्र येणे हा राजकीय आश्चर्याचाच विषय होता. त्याचं कारणही तसंच होतं. हिंदुत्वाच्या रेशमी धाग्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांची रौप्यमहोत्सवी वर्षे पूर्ण करणारी युती २०१४ साली भारतीय जनता पक्षाच्या उथळ नेतृत्वाने तोडली होती. त्यामुळे शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस बरोबरची महाविकास आघाडी ही राजकीय अभ्यासकांच्या कल्पने पलीकडची होती. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी स्थापन करण्यात आलेले हे सरकार फार काळ चालणार नाही, टिकणार नाही, असे म्हणणारे गेल्या दोन वर्षापासून हात चोळत बसलेत. पण बाळासाहेब थोरात यांनी सरकार स्थापन झाल्यावर ज्या पद्धतीने काम सुरु केले त्याला तोड नाही.
पाया मजबूत असला की इमारत भरभक्कम राहते, या न्यायाने बाळासाहेब थोरात यांनी आपला पाया मजबूत ठेवण्यासाठी जे जे करता येईल, ते ते केले आहे आणि करीत आहेत. २०२० च्या सुरुवातीला संगमनेर या आपल्या कर्मभूमित, मतदारसंघात आपल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने एक अत्यंत अभिनव असा कार्यक्रम आयोजित केला. आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरे या महाविकास आघाडी सरकारच्या दोन तरुण मंत्र्यांच्या बरोबरीने सहा युवा आमदारांना या कार्यक्रमाला पाचारण केले होते.
मराठी वाहिनीवरील प्रख्यात कार्यक्रमाचे ‘न्यायाधीश’ असलेले जय महाराष्ट्र गीताने मराठी माणसाच्या मनात घर करणारे अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे, अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील या नवतरुण आमदारांची मुलाखत घेतली. या अभिनव कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला हा ऐतिहासिक, बौद्धिक मेजवानी देणारा सोहोळा बाळासाहेब थोरात यांची यांच्या कल्पकतेची साक्ष देणारा ठरला.
आयुष्यात थेट मंत्री बनलेले आदित्य ठाकरे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरुन थेट राज्यमंत्री बनलेल्या अदिती तटकरे यांच्या बरोबरीने रोहित, धीरज, झिशान, ऋतुराज यांनी कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता, बिनधास्त, बेधडकपणे आणि हजरजबाबी पणे उत्तरे दिली. अवधूत गुप्ते यांनी टाकलेल्या प्रत्येक गुगलीला सर्वांनी सीमापार टोलविले. प्रत्येकाच्या बोलण्यातून परिपक्व राजकारणी डोकावतांना दिसत होता. हे सारे अंगभूत गुण बाळासाहेब थोरात यांनी कल्पकतेने सर्वांसमोर आणले.
बाळासाहेब थोरात एवढ्या एकाच कार्यक्रमावर थांबले नाहीत तर त्यांनी कोरोनाच्या सर्व नियमांच्या चौकटीत राहून विविध क्षेत्रातील युवा गुणवंतांना संगमनेर येथे पाचारण करुन तेथील नागरिकांना बौद्धिक, सांगितिक ज्ञानामृत उपलब्ध करुन दिले. सा रे ग म फेम विश्वजित बोरवणकर यांचा कार्यक्रम आयोजित करुन श्रवणेंद्रियांना अत्युच्च आनंद मिळवून दिला. अमृतवाहिनीची बाळासाहेबांनी सर्वत्र आणि विविध क्षेत्रात गरुडझेप घेण्यास सिद्धता असल्याचे दाखवून दिले.
निवडणुका आणि राजकारण हा खेळ आहे, तो काळजीपूर्वक खेळला पाहिजे, ही भूमिका बाळासाहेब थोरात हे सातत्याने मांडत आले आहेत. काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार अशी असंख्य नेतेमंडळी विविध प्रकारच्या स्वभावाची आहेत. कुणी शांत तर कुणी आक्रमक. अशा सर्वांबरोबर सहकार्य, समन्वय, सौहार्द आणि सामंजस्य अशा चतुःसूत्रीने काम करुन बाळासाहेब थोरात यांनी आपला आगळा वेगळा ठसा महाराष्ट्राच्या राजकारणात इतकेच नव्हे तर अगदी १०, जनपथ पर्यंत उमटविला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेप्रसंगी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात ही त्रिमूर्ती अग्रभागी होती. राज्यातील तीनही पक्षांचे तत्कालीन प्रमुख या नात्याने जो समन्वय साधण्यात आला तो पाहता हे आघाडी सरकार चिरकाल टिकल्याशिवाय राहणार नाही, याचीही ग्वाही जणू देण्यात आली. बाळासाहेब थोरात यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो आणि त्यांच्या ‘रत्नपारखी’ नजरेतून नवनवे नेतृत्व उदयास येवो, ही त्यांच्या कुलदेवतेकडे प्रार्थना.
-योगेश वसंत त्रिवेदी
[email protected]/9892935321