बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेतून मराठवाडा विकासाचा नवा अध्याय – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती संभाजीनगर : बीड ते अहिल्यानगर रेल्वेचं हे स्वप्न खूप जुनं आहे. १९९५-९६ मध्ये या कामाची सुरुवात झाली होती, पण गती मिळाली नाही. बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेच्या माध्यमातून मराठवाडा विकासाचा नवा अध्याय सुरू होतोय, असं अभिमानानं सांगतो. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे आणि त्यासाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. आज अमळनेर (भां.) ते बीड या नवीन रेल्वे मार्गाचं उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेच्या शुभारंभ करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री पवार उपस्थित राहिले.
पवार म्हणाले की, आपण सर्वांनी आत्मचिंतन करायला हवं. माणूस म्हणून माणुसकी जपली, समाजकल्याणासाठी काम केलं, तरच खरी प्रगती होईल. आज या शुभ प्रसंगी मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. या ऐतिहासिक दिवशी आपण या कामाचा शुभारंभ करत आहोत. या प्रकल्पाला गती दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मी आभार मानतो. आजचा दिवस हा फक्त बीड-अहिल्यानगरवासीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाचा आहे. हा मार्ग केवळ दोन जिल्ह्यांना जोडणारा नसून विकासाची नवी दिशा दाखवणारा आहे. अहिल्यानगरपासून पुणे आणि पुढे मुंबईपर्यंत रेल्वेसेवा सुरू होणार आहे. आता रेल्वे सोबतच एअरपोर्ट, CIIIT सारख्या शिक्षण संस्था, पशूवैद्यक महाविद्यालय, आरोग्य सुविधा, रोजगार निर्मिती या सर्व क्षेत्रांमध्ये बीडचा विकास वेगानं होणार आहे.