अबब! ‘या’ गावातील शेतकऱ्याने खोदली महाकाय विहीर; तब्बल एक एकर जागेत पसरलीय ही विहीर…

बीड: बीड जिल्हा आणि दुष्काळ हे समीकरणच बनलं होतं. मात्र गत वर्षी पावसाच आगमन झालं आणि थोडाफार दिलासा मिळाला होता. परंतु भविष्यकाळात पुन्हा दुष्काळात पडू नये, यासाठी बीडच्या एका शेतकऱ्यांन चक्क एक एकरात महाकाय अशी विहीरच खोदली . काठोकाठ भरलेलं हे पाणी पाहून तुम्हाला हे कुठलं तरी धरण असेल असा भास होईल. मात्र हे कुठल धरण नाही तर एका शेतकऱ्याच्या घामाचं फलित आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल एक एकरामध्ये ही महाकाय अशी विहीर आहे. या विहिरी कडे बघताना तुमचे डोळे दिपवून जातील मात्र या विहिरी मागचा संघर्षही तेवढाच महत्त्वाचा आहे.
सतत पाचवीला पुजलेला दुष्काळ आणि त्यातून पदरी येणारी निराशा या शेतकऱ्यांना कायमचीच संपवून टाकली आहे.गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील शेतकरी मारुती बजगुडे यांना बारा एकर जमीन आहे. जमीन कोरडवाहू त्यामुळे सर्वच पिके पावसावर विसंबून पाऊस झालाच नाही तर वर्षभरात मूठभर ही धन्य पदरात पडत नाही. त्यामुळे एक एकर परिसरात विहीर खोदण्याचा स्वप्न मारुती बजगुडे यांनी उराशी बाळगलं… आणि विहीर खोदण्यास सुरुवात झाली.
बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होतं अन याचाच फायदा या शेतकऱ्यांनी उचलला. विहीर खोदत असताना निघणारं साहित्य आयआरबीला विकून टाकलं, त्यामुळे विहीर बनण्यास सहजता मिळाली त्यातून या शेतकऱ्याला आर्थिक लाभ देखील झाला. या महाकाय अशा विहिरीचा व्यास 212 फूट असून खोली 42 फूट इतकी आहे. ही विहीर बांधण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागले आतापर्यंत दोन कोटी रुपयांच्या आसपास या विहिरीला खर्च आला आहे.
ही महाकाय विहीर पाहण्यासाठी पंचक्रशीतील ग्रामस्थ अवरजून इथे येत आहेत. दुष्काळ हटवून पाण्याच्या अमुक तमुक योजना राबविण्याच्या वल्गना सरकारमधल्या मंत्र्यांकडून वारंवार केल्या जातात. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. परंतु बीडच्या या शेतकऱ्याने तीन वर्ष संघर्ष करून बांधलेली ही महाकाय विहीर इथल्या राजकारण्याना चपराक मारणारी आहे.