ST महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST महामंडळ) अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही काळापुरते संजय सेठी यांची नियुक्ती केली होती, मात्र आता सरनाईक यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ST महामंडळाच्या अध्यक्षपदी सरनाईक यांची नियुक्ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोणताही दुरावा नसल्याचा स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय असलेल्या सरनाईक यांना परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी दिल्यानंतर त्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले होते. त्यानंतर आता महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
ST महामंडळ राज्यभरातील प्रवाशांसाठी महत्त्वाची सेवा बजावते. महामंडळाच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे, कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील प्रश्न सोडवणे आणि सेवा अधिक प्रभावी करणे यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरनाईक यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाची सेवा अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





