महाराष्ट्रमुंबई

मुस्लिम बांधवांकडून दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाची महाआरती..

 

मुंबई: गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या सणामध्ये भक्ती, उत्साहाबरोबरच एकतेचाही संदेश दिला जातो. याचेच प्रतीक इंदापूरमध्ये पाहायला मिळाले. इंदापूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी येऊन गणरायाची महाआरती केली. या उपक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात दिला गेला असून, “इंदापूर पॅटर्न” ही नवी संकल्पना राज्यभर चर्चेत आली आहे.

आरतीवेळी वातावरण “गणपती बाप्पा मोरया” या घोषणांनी दुमदुमले. मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने आरतीत सहभागी होत भरणे कुटुंबीयांसमवेत गणेशोत्सवाचे औचित्य साधले.

या प्रसंगी दत्तात्रय भरणे म्हणाले की, “इंदापूरमध्ये नेहमीच बंधुभाव, एकोपा आणि ऐक्याची परंपरा जपली जाते. धर्म वेगळा असला तरी सण-उत्सवात सहभागी होणे हीच खरी आपली ताकद आहे. मुस्लिम बांधवांनी महाआरतीत दिलेला सहभाग हा सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे.या महाआरतीव्दारे एकता, बंधुत्वता,शांतता, आपुलकी आणि समाजिक सलोखा वाढण्यास मदत होईल. सर्वांना सोबत घेऊन जाणं ही महाराष्ट्राची परपंरा आहे. महाराष्ट्राची ही परंपरा कायम राहणे हेच आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आज हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन दिलेला हा ऐक्याचा संदेश समाजासाठी प्रेरणादायी आहे.”

स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. “धर्म वेगळे असले तरी आपल्या भावना, सुख-दुःख हे एकच आहे. तसेच सर्वांची मने एकच आहेत. गणरायाच्या आरतीतून मिळालेला हा सलोख्याचा संदेश गावागावात पोहोचला पाहिजे,” असे एका नागरिकाने मत व्यक्त केले.

वातावरण भक्तीमय आणि ऐक्याच्या भावनेने भारावून गेले होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिलेला हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश केवळ इंदापूरपुरता मर्यादित न राहता, राज्यभर एक आदर्श ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.गणेशोत्सवाच्या या मंगलमय वातावरणात हिंदू-मुस्लिम एकतेची महाआरती इंदापूर तालुक्यात कौतुकास्पद ठरली असून यातून सामाजिक ऐक्याचा आदर्श उभारला गेला आहे.

या उपक्रमाला स्थानिक मान्यवर, नागरिक व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!