
मुंबई: कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून एकदाही मास्क न वापरणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेर कोविड ची बाधा झाली आहे. राज ठाकरे यांच्या सोबतच त्यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांना देखील कोविडची बाधा झाली आहे. या दोघांना सौम्य लक्षणे आहेत. तर त्यांचा नोकर देखील बाधित झाल्याने त्याला मात्र महापालिका विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.
राज ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांचे मुंबईसह इतर ठिकाणचे दौरे रद्द झाले. त्यांची कोविड चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. राज ठाकरे हे घरीच असून त्यांच्या आईला लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. पण त्यांची तब्येत स्थिर असल्याचे बोलले जाते. तर त्यांच्या नोकराला विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या वृत्ताची पुष्टी केली आहे.
राज ठाकरे हे कोरोना ची साथ सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मास्क लावत नव्हते, मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकिला देखील ते न मास्क लावता गेले होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारील खुर्चीत बसले होते. राज ठाकरे यांच्या मास्क न लावण्याच्या सवयींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मास्क न लावण्यात कसले आले आहे शौर्य ? अशा शब्दात टोकले होते.