ज्येष्ठ क्रिडा पत्रकार सूर्यकांत फातर्फेकर यांचे निधन

मुंबई:- मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्माननिय सदस्य व ज्येष्ठ पत्रकार श्री.सूर्यकांत फातर्फेकर यांचे काल शुक्रवारी रात्री ८.४७ वा. गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटर येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
काल रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चिरंजीव गौरव, विवाहीत कन्या सौ.प्रियांका विवेक कुंडेकर, जावई, नातू असा मोठा परिवार आहे.
जुन्या पिढीतील एक बुजुर्ग पत्रकार म्हणून फातर्फेकरांचा दबदबा होता. त्यांनी लोकसत्ता, चित्रा, लोकमान्य आदी दैनिकांतून क्रिडा पत्रकारिता केली. तसेच ‘मौज’, ‘हेमांगी’ या अंकांतून देखील काही काळ काम केले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी त्यांचे निकटचे संबंध होते.
स्वभावाने परखड असलेले फातर्फेकर स्वभावाने तितकेच मृदू होते. चांगले काम करणार्या लोकांचे त्यांना सदैव कौतूक वाटे. पत्रकार संघाच्या कार्यात ते अखेरपर्यंत सक्रिय होते.