मोठी बातमी! पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा मोर्चेकऱ्यांनी रोखला

पंजाब:- सध्या पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे.अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबमधील फिरोजपूर दौऱ्यावर होते. मात्र या दरम्यान त्यांचा ताफा मोर्चेकर्यांनी अडवल्याचं चित्र पाहायला मिळालं. तब्बल पंधरा ते वीस मिनिटं त्यांचा ताफा एकाच जागेवर थांबून राहिला. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा दौरा रद्द करून दिल्लीला परतावे लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबला येत असल्याची माहिती गृह मंत्रालयाने पंजाब सरकारला आधीच दिली होती. दरम्यान या दौऱ्याच्या नियोजनामध्ये पंजाबच्या स्थानिक पोलिस प्रशासनाने योग्य ते नियोजन न केल्यामुळे पंतप्रधानांना दौरा रद्द करावा लागल्याचे बोलले जात आहे.
या दौऱ्यादरम्यान मोदींचा ताफा अडवण्यासाठी पंजाब मधील मोर्चेकऱ्यांनी बसेस आणि गाड्या रस्त्यामध्ये आडव्या लावल्या होत्या. हा रस्ता मोर्चेकऱ्यांपासून मोकळा करण्यात यावा यासाठी पंजाबमधील भाजप नेत्यांकडून राज्य शासनातील नेत्यांशी संपर्क साधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र, योग्य प्रतिसाद न मिळाल्याने पंतप्रधान कार्यालयाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा दौरा रद्द करावा लागला. गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा फटका मोदींना पंजाबमध्ये या दौऱ्यादरम्यान बसल्याचं समोर आले आहे.