
मुंबई- राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे.अश्यात राज्य सरकारने सर्तक होत राज्यात विविध निर्बंध लावले आहेत.दरम्यान हे निर्बंध लावूनही रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच एक महत्वाची बैठक पार पडली आहे. सकाळी ९ वाजता या तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव आणि इतर महत्वाचे अधिकारीही उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा टास्क फोर्सकडून आढावा घेतला.यानंतर या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.या मंत्रालयातल्या बैठकीचा अहवाल लगेचंच मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार आहे. त्यानतंर मुख्यमंत्री कोणते निर्बंध लावायचे यासंबंधी निर्णय घेणार आहेत. त्यानुसार काही कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात तूर्तास लॉकडाउन लावण्याचा विचार नाही, मात्र निर्बंध कडक केले जाण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक कंबरडं मोडलं असताना आणि राज्याची आर्थिक स्थिती पाहता लॉकडाउन लावण्याचा सरकारचा विचार नाही अशी माहिती मिळत आहे.आज रात्री यासंबंधी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.