मोठी बातमी! नागपूरात नितीन गडकरींच्या घराबाहेर कॉंग्रेसची निदर्शेने,भाजप-कॉग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडले

नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत केलेल्या महाराष्ट्राबाबतच्या वक्तव्याचा महाराष्ट्र कॉंग्रेसकडून जोरदार निषेध करण्यात येत आहे.अश्यात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने निदर्शने केली. दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर लावण्यात आला होता.
दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते आल्याचे पाहून भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी तणावपूर्ण वातावरण इथे निर्माण झालं होतं.दरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं.पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी कॉंग्रेस आज आक्रमक झाल्याचं दिसलं.
काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशभरात करोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते.