भाजप नेते आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी…,शेलारांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई:- राजकिय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून धमक्यांचे सत्र सुरू आहे.मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीनंतर आता भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दिली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे शेलार यांना धमकी देण्यात आली होती. त्यात कारवाई करून पोलिसांनी आरोपीला मुंब्रा येथून अटक केली होती.
दरम्यान आता पुन्हा भाजपचे नेते आशिष शेलार यांना फोनवरून अज्ञाताने धमकी दिली आहे. शेलार यांना दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फोन आले असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी अज्ञाताने शेलार यांना धमकी देत अर्वाच्च भाषा वापरली आहे. या प्रकारानंतर शेलार यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दिली आहे.
ज्या मोबाईल क्रमांकांवरून धमकी देण्यात आली होती, त्या दोन्ही क्रमांकांची माहिती देऊन याचा तपास करावा, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. याबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार आहे.