आदित्य ठाकरे यांना उद्देशून वादग्रस्त कृती करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांच्या निलंबनासाठी शिवसेना सदस्य विधानसभेत आक्रमक

मुंबई- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून वादग्रस्त कृती करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांचं निलंबन करावं, अशी मागणी करत शिवसेना सदस्य आज विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले. त्यांच्या निलंबनाच्या मागणीनंतर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं.आमदार सुहास कांदे यांनी हा विषय सभागृहात मांडला. त्यांनी सांगितलं की, आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी टिका केली होती. त्यावर नितेश राणे यांनी पुन्हा आपण असं बोलणार असं म्हटलं आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. मोदींपेक्षा जरी आदित्य ठाकरे लहान असले तरी त्यांच्यावर अशाप्रकारे टिका करणं योग्य नाही. जर कोणी वाईट बोललं तर खपवून घेतलं जाणार नाही,असं कांदे म्हणाले.
कांदे म्हणाले की, ‘मोदींबाबत जेव्हा भास्कर जाधव यांनी कृती केली तर त्यांनी त्याबाबत माफी मागितली. आता नितेश राणे यांनी जे वक्तव्य केले आहे. तात्काळ माफी मागायला हवी’. याचसोबत यावर प्रतिक्रिया देत भास्कर जाधव म्हणाले की, ‘मी तीन दिवसांपूर्वी काही वक्तव्य केलं. त्यावेळी मी माफी मागितली.आता दोन दिवसांपूर्वी जी नितेश राणे यांनी टिप्पणी केली, त्यांनी जो आवाज काढला, तो मुद्दा सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे ही बाब लक्षात घेवून नितेश राणे यांना कायम स्वरूपी निलंबित करण्याची मी मागणी करतो’.
यानंतर शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी अध्यक्षांसमोर येऊन घोषणाबाजी केली. तसेच नितेश राणे हाय हायच्या जोरदार घोषणा दिल्या. यामुळं सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘नितेश राणे यांच्याबाबत जो मुद्दा उपस्थित झाला. त्याबाबत आम्ही बोललो की असं व्हायला नको होतो. भास्कर जाधव भुजबळांना बघून हुप हुप करायचे. याचं देखील समर्थन होऊ शकत नाही. जर हे ठरवून आला असाल की आमदाराला निलंबित करायचं आहे हे लोकशाहीला धरून नाही, असं फडणवीस म्हणाले. मी स्वतः भूमिका घेतली होती की नितेश राणे यांनी चुकीचं केलं आहे. आधी तुम्ही १२ निलंबित केले. आता आणखी एक निलंबित करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. सरकार बदलत असतात, एकदा तुम्ही जर पायंडा पाडला, तर पुढील काळात विरोधक उरणार नाहीत, असं फडणवीस म्हणाले.