
मुंबई:शनिवार मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरजन्य स्थिती निर्माण होऊन अनेक सखल भागांना पावसाचा चांगलाच फटका बसला. सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊन अनेक ठिकाणी दरडी, घरं कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. नुकत्याच चेंबूर, भांडुप, विक्रोळी येथे दरड कोसळून घडलेल्या भयंकर दुर्घटनेत जवळपास ३२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
या दुर्घटनेनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून (Samna Editorial) महापालिकेचं समर्थन करत या दुर्घटनेला नैसर्गिक पाऊस जबाबदार असल्याच म्हटलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपा विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड(Prasad lad)यांनी शिवसेनेला ट्विट करत खोचक प्रश्न विचारला आहे.
“ये मुंबई है ये सब जानती है…”
“२०१७ मध्ये मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार होते, २०२१ ला मुंबई तुंबली तेव्हा पाऊस जबाबदार, असं कसं चालेल?” असा प्रश्न प्रसाद लाड यांनी विचारला. यासोबत त्यांनी 2017 सालच्या सामना या वृत्तपत्रातील एक कात्रण देखील जोडले आहे. ज्यामध्ये ‘पावसाळ्यात मुंबई तुंबली तर मुख्यमंत्री जबाबदार’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवरून प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.