महिलांबाबत भाजपची विकृती संगमनेर मध्ये पुन्हा एकदा स्पष्ट

जयश्री थोरातांच्या चारित्र्यावर हल्ला करत धमकी : कॉंग्रेसचा तीव्र निषेध
मोदी – शहांनी महिलांची माफी मागावी – चयनिका उनियाल
मुंबई- महिलांबाबत भाजपची विकृती संगमनेर मध्ये पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. कॉंग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री यांचेबद्दल अश्लाघ्य वक्तव्य करत त्यांना घराबाहेर पडू न देण्याची धमकी देण्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमीत शहा यांनी याबाबत माफी मागावी. राष्ट्रीय आणि राज्यातील महिला आयोगाने तातडीने कारवाई करायला हवी, अशी मागणी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया समन्वयक आणि मुंबईतील मीडिया प्रभारी श्रीमती चयनिका उनियाल यांनी दिला आहे.
मतांसाठी लाडक्या बहिणी म्हणत सोंग करायचं आणि याच बहिणी बोलायला लागल्या की त्यांची लक्तरं काढायची ही भाजपची निती आहे. जयश्री थोरात या कॉंग्रेसच्या तरूण नेत्या आहेत. त्यांच्या घराला आदर्श राजकारणाचा इतिहास आहे. मात्र सुजय विखे पाटील यांच्या प्रचार सभेत जयश्रीताई थोरात यांच्याबाबत सुजय विखेंचे समर्थक, भाजपाचा विकृत वसंत देशमुख तोंडाची गटारगंगा वाहत असताना सुजय विखे मंचावर टाळ्या वाजवत हसत होते, जनाची नाही तर मनाची लाज असती तर स्वतःच्या भाषणात त्याचा निषेध व्यक्त केला असता. पण भाजपची महिलांबाबत विकृती अशी बाहेर येत असते, असंही चयनिका उनियाल म्हणाल्या.
देशभर या प्रकरणाचे पडसाद उमटत असताना या निंदनीय आणि संतापजनक प्रकाराविरोधात भाजपचे लोक गप्प आहेत. अशा महिला विरोधी विकृत मानसिकतेचा काँग्रेसच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोतच, पण मोदी, शहांनी समस्त महिलांची माफी न मागितल्यास समस्त महिला त्यांना मतदानाद्वारे धडा शिकवतील, असा इशाराही श्रीमती उनियाल यांनी दिला आहे…





