महाराष्ट्रमुंबई

सोमनाथ सुर्यवंशींची हत्याच, जबाबदार पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी: राहुल गांधी


राहुल गांधींनी घेतली सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट.

परभणी : परभणीतील तरुण सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता. तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे २० ते २५ मिनिटे संवाद साधला. परभणीतील घटनेची सर्व माहिती जाणून घेतली व कुटुंबाला धीर दिला.

सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीतील मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे. ज्यांनी ही हत्या केली त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचे सांगत तेही याप्रकरणी तितकेच जबाबदार आहेत असे म्हटले. आरएसएसची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची असून या भेटीत कोणतेही राजकारण करणार नाही. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

परभणी व बीड प्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणू.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरण दडपण्याचे पाप सरकार करत आहे. सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले पण आम्ही वस्तुस्थिती जाणून घेतली आहे, सोमनाथ सुर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सांगितले आहे. सोमनाथ सुर्यवंशी व संतोष देशमुख प्रकरणी अधिवेशनात प्रश्न मांडला पण मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. काँग्रेस यासंदर्भात मुख्यमंत्र्यांविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणेल. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्याऱ्यांना सोडणार नाही. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक समाजावर भाजपा सरकार अत्याचार करत आहे. काँग्रेस या अत्याचाराविरोधात आवाज उठवून पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे काम करेल, असेही पटोले म्हणाले.
यावेळी राहुल गांधी यांच्याबरोबर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, डॉ. नितीन राऊत, आ. अमित देशमुख, यशोमती ठाकूर, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खा. प्रणिती शिंदे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, खा. रविंद्र चव्हाण, खा. संजय जाधव प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी अपस्थित होते, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपुडकर, परभणी शहराध्यक्ष नदीम इनामदार आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!