
सिंधुदुर्ग:मालवण तालुक्यातील तळगाव गावडेवाडी तलावानजिक दोन दिवसांपूर्वी बैल झुंजीचे अनधिकृतपणे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला. या प्रकरणात एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील १२ मुख्य संशयितांसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी व शिवसैनिक रुपेश पावसकर यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
प्युअर अॅनिमल लव्हर (पाल) या प्राणी प्रेमी संस्थेच्या माध्यमातून सुप्रिया दळवी (रा. कोळंब, मालवण) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांवर भादवि कलम ४२९, ३४ यासह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११ नुसार गुन्हा दाखल झाला.