मुंबई

मंदिरात अत्याचार करून महिलेची हत्या, दोषींच्या फाशीसाठी पाठपुरावा करू – रूपाली चाकणकर

पीडितेच्या कुटुंबाची घेतली नवी मुंबईतील घरी भेट

नवी मुंबई – नवी मुंबईतील शीळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यातील आरोपींना फाशीची शिक्षा होईल यासाठी आयोग पाठपुरावा करेल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले. आज पीडित महिलेच्या कुटुंबाची त्यांनी नवी मुंबईतील घरी भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.

काही दिवसांपूर्वी ही घटना समोर येताच राज्य महिला आयोगाने याची दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आणि आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. आरोपींची अटक, तपास या दरम्यान श्रीमती चाकणकर पोलिसांकडून वेळोवेळी माहिती घेत होत्या.

श्रीमती चाकणकर यांनी आज या दुर्दैवी घटनेतून सावरणाऱ्या पीडित कुटुंबाची नवी मुंबईतील त्यांच्या घरी भेट घेतली. आई वडील, बहीण यांच्याकडून तिच्या सासरच्या त्रासाची पार्श्वभूमी समजून घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करत या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाबाबत कुटुंबियांना माहिती द्यावी, त्यांच्या शंकांचे निरसन करावे अशा सूचना पोलिसांना आज दिल्या आहेत. आरोपीवर कठोर कलमे लावून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावी असे ही पोलिसांना सांगितले आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षाच व्हावी यासाठी महिला आयोग पाठपुरावा करेल. ही महिला सासरच्या छळाला सामोरी जात होती त्यांच्यावर ही योग्य त्या कायद्यांतर्गत कारवाई होईल. पीडित महिलेच्या कुटुंबाला, तिच्या लहान मुलाला शासकीय मदत मिळावी यासाठी ही आयोग प्रयत्न करेल असे ही त्या म्हणाल्या.

या भेटी वेळी उपस्थित सहायक पोलिस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी आतापर्यंतच्या तपासाची माहिती दिली.

दुर्दैवाने एखाद्या महिलेला घराबाहेर पडावे लागले तर नजीकचे पोलीस स्टेशन, वन स्टॉप सेंटरला मदत मिळते याबाबत जनजागृती करणं गरजेचे आहे, माध्यमांनी याबाबत काम करावे असे ही त्यांनी माध्यमांशी झालेल्या संवादात सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!