महाराष्ट्रमुंबईराजकीय

ओबीसी तरुणांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी २ सप्टेंबरचा जीआर तात्काळ रद्द करा – वडेट्टीवार

महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी आणि गुंडांना वेळेत शस्त्र परवाने मिळावे म्हणून विशेष काऊंटरची व्यवस्था करावी वडेट्टीवार यांचा महायुती सरकारला टोला

नागपूर : अकोल्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय बोचरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय.२ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाले आहे. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने हा काळा शासन निर्णय रद्द केलाच पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

नागपूर इथे उद्या विदर्भातील ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची तयारीची पाहणी आज काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली. यशवंत स्टेडियम इथे पाहणी केल्यावर वडेट्टीवर यांनी माध्यमांशी संवाद साधला.पातुर तालुक्यातील आलेगावातील बसस्थानकाच्या शेडमध्ये विजय बोचरे यांनी गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नावे एक पत्र लिहिले आणि ते व्हाट्सअप स्टेटसला ठेवले होते. एकीकडे ओबीसी तरुण आत्महत्या करत असताना महायुती सरकार मात्र कुंभकर्णासारखे झोपून आहे. हे सरकार ओबीसी समाजातील ३७४ जाती संपल्या पाहिजे ते सरकारचे गुलाम झाले पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. ओबीसी समाजातील आरक्षण वाचवण्यासाठी नागपुरात महामोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये, लढावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

पुणे येथील गुंड घायवळ याच्या भावाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने शस्त्र परवाना देण्यात आला आहे. गुंड घायवळ पासपोर्ट मिळवतो,देश सोडून जातो त्याच्या डोक्यावर कुणाचा आशीर्वाद आहे? राज्यात गुंडांना पासपोर्ट, शस्त्र परवाना मिळावा यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. गुंडांना पोसण्यासाठी महायुती सरकारने आता लाडका गुंड योजना आणावी या अंतर्गत शस्त्र परवाने द्यायला विशेष काऊंटरची व्यवस्था करावी अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. गुंडांना शस्त्र परवाने वेळेत मिळावे म्हणून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना शस्त्र परवाने वाटपाचे काम देऊन टाकावे ,म्हणजे या गुंडांचा वापर निवडणुकीतही करता येईल, असा टोला वडेट्टीवार यांनी हाणला.

नागपुरात होणाऱ्या मोर्च्यात ओबीसींच्या प्रश्नावर लढणाऱ्या प्रत्येकाने सहभागी व्हावे. हा मोर्चा माझ्या नेतृत्वात नाही, जण कुणाला ओबीसींच्या प्रश्नावर लढण्याची इच्छा आहे त्यांनी या मोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले. उद्या यशवंत स्टेडियम इथून मोर्चाला सुरुवात होणार आहे, या मोर्चाची सांगता संविधान चौक येथे होणार आहे. सरकारने २ सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी समाज लाखोंच्या संख्येने मोर्च्यात सहभागी होणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!