महाराष्ट्र हा सुसंस्कृत! जरांगेंनी मर्यादेत बोलावे अन्यथा सोडणार नाही! आ. दरेकरांचा थेट इशारा

मुंबई- बीडमध्ये झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी अपमानास्पद भाष्य केले. यावरून भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आक्रमक होत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत एवढा व्यक्तीद्वेष आहे कि जरांगेंनी आईवरून शिव्या देऊन मुख्यमंत्री यांच्या आईचा अपमान केला आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सुसंस्कृत आहेत. तुमच्यासारखे अडेलतट्टू विनासंस्काराची भाषा ते करत नाहीत. जरांगे मुख्यमंत्री यांना अपशब्द बोलता मग तुम्हाला आम्ही सुपारीखोर, चिंधीचोर बोलू का? आपल्या मर्यादेत बोला. मराठा समाज महाराष्ट्रात मोठा आहे, या समाजाची महाराष्ट्रात ताकद आहे. ती माझ्या बापाचीच मालकी आहे, अशा भूमिकेतून बोलणार असाल तर तुम्हालाही आम्ही सोडणार नाही, असा थेट इशाराच जरांगेंना दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले कि, महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. मराठा समाजावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार हे सुसंस्कृतपणाचे आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांची पैदास काढणे हा विकृतपणा आहे. जरांगे कसली औलाद आहे, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतोय. समाजासमाजात वाद निर्माण करायचे, कायदा सुव्यवस्था भंग करायची आणि आपण जसेकाय मराठा समाजाचे मालक आहोत या अविर्भावात आईवरून शिव्या देणार असाल तर असा विचार छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा कुठलाही व्यक्ती करू शकत नाही, असेही दरेकर म्हणाले.
तसेच जरांगेंनी आंदोलन करावे, आपल्या मर्यादेत, क्षमतेत करावे आम्हीही त्या मातीतील, रक्ताचे आहोत त्यामुळे खबरदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आईवरून काही बोललात तर जशास तसे उत्तर देणारी यंत्रणा आम्हाला उभी करावी लागेल. आपल्या प्रश्नावर लक्ष ठेवा, चर्चा करा. मुख्यमंत्री सहनशील आहेत. ते चर्चा करतील. आणखी कायकाय पर्यायी मार्ग काढता येतील त्यासाठी प्रयत्न करतील, असेही दरेकर म्हणाले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्यासाठी काही केले नाही, केवळ दुर्लक्षच केले. ३०-४० वर्ष ज्यांनी या राज्याचे नेतृत्व केले, मराठ्यांच्या नावावर राजकारण केले त्यांनाही मराठ्यांविषयी कधी आपुलकी वाटली नाही. आता जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस यांना निशाणा करताहेत. फडणवीस ज्या पद्धतीने विकास करताहेत, शेतकऱ्यांसाठी काम करताहेत, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करताहेत त्या हतबलतेतून हे मोठे राजकीय षडयंत्र आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला.
यामागे शंभर टक्के मोठे राजकीय षडयंत्र
दरेकर म्हणाले कि, यामागे शंभर टक्के मोठे राजकीय षडयंत्र आहे. योग्य वेळी ते बाहेर येईलच. पडद्यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत, या सगळ्याला अर्थपूरवठा कोण करतेय, कोण व्यवस्था लावतेय. कारण देवेंद्र फडणवीस राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात भक्कम झालेत. राज्याच्या राजकारणावर त्यांची कमान, पक्की मान बसलीय. त्यामुळे त्यांना निवडणुकीत हरवू शकत नाही, राजकीय दृष्ट्या सामोरे जाता येत नाही, मग असा रडीचा डाव खेळून कुणाच्यातरी खांद्यावर बंदूक ठेवायची आणि आपला डाव साध्य करायचा असा प्रयत्न असल्याचा आरोपही दरेकरांनी केला.