माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सीबीआय कडून छापे
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ‘वर्षा’ वर दाखल..
हमुंबई, दि.२४:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूध्द केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर दाखल केला असून आज सकाळपासून त्यांच्या मुंबई, नागपूर येथील घरांवर छापे घातले आहेत.
दरम्यान, देशमुख यांना चौकशीसाठी सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही.दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूध्द सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यातील आपला नियोजित दौरा रद्द थेट वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी धाव घेतली असून त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक सुरु आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रूपयांच्या हप्ता वसुलीचे आरोप केले होते. या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्याआदेशानुसार सीबीआय देशमुख यांची चौकशी करीत आहे.