दिलासादायक: सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही..
कोरोना तज्ज्ञगटाचे प्रमुख अरोरा यांचे मत

नवी दिल्ली: सणासुदीच्या दिवसांनंतर देशात कोरोना साथीची तिसरी लाट येऊन स्थिती आणखी बिकट होईल, अशी शक्यता सातत्याने वर्तवली जात असली तरीही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची तूर्त तरी शक्यता नाही, असे मत केंद्र सरकारने नेमलेल्या कोरोनाविषयक तज्ज्ञगटाचे प्रमुख प्रा. एन. के. अरोरा यांनी व्यक्त केले आहे.
त्यांच्या या उद्गारांनी करोडो भारतीय नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरपर्यंत कोरोना लसीचे ११० कोटींहून अधिक डोस लोकांना दिले जाण्याची शक्यता आहे.लसीकरण मोहिमेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष तसेच इंडियन सार्स-कोव्ह-२ जिनोमिक्स कॉन्सोर्टियमचे सहअध्यक्ष असलेल्या प्रा. एन. के. अरोरा यांनी दिलासा देतानाच सावध राहण्याचा इशाराही देखील दिला आहे.
सध्या दररोज कोरोना लसीचे ८५ लाख ते एक कोटीहून अधिक डोस देण्यात येत आहेत. अशा वेगाने मोहीम राबवली गेल्यास सर्व प्रौढ व्यक्तींना लसीचा पहिला डोस तरी मिळालेला असेल.
मात्र, अजूनही ३० टक्के लोकांना लस मिळाली नसल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन जनतेने सणासुदीच्या दिवसांत व नंतरही प्रतिबंधक नियमांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन प्रा. एन. के. अरोरा यांनी केले.