ब्रेकिंग

महाविकास आघाडीला धक्का देत जिल्हा बँक निवडणुकीत नारायण राणेंच्या पॅनलने मिळवलं वर्चस्व

सिंधुदुर्ग- संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीची आज मतमोजणी पार पडत आहे. अश्यातच सकाळपासून हळूहळू धक्कादायक निकाल समोर येत आहेत. महाविकास आघाडीला या निवडणुकीमुळे मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर ही निवडणुक सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. या हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे अडचणीत सापडले.न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये या प्रकरणावरुन जोरदार वाद सुरु झाला.

अश्यातच आता भाजपाने या निवडणुकीत विजयाची आघाडी घेतली आहे. भाजपाच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने सोळापैकी दहा जागांवर विजय मिळवला. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

सहकारी पणन संस्था, शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था या मतदारसंघामध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या सुरेश दळवी यांचा पराभव केला आहे. तर सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था या मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली पराभूत झाले असून महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी झाले आहेत.

सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे भाऊ असल्याने याठिकाणी भाजपाला धक्का बसला आहे. दरम्यान, भाजपाच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलला आठ तर महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलला सात जागांवर विजय मिळाला आहे.

यावेळी कणकवलीमधून सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली होती. समसमान मतं पडल्यानंतर चिट्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष होते. तर औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघातून भाजपाचे गजानन गावडे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या लक्ष्मण आंगणे यांचा पराभव केला आहे.

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून महाविकास आघाडीचे मेघनाथ धुरी हे विजयी झाले आहेत. धुरी यांनी भाजपाच्या गुलाबराव चव्हाण यांचा पराभव केला आहे. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांना पराभूत करत भाजपाच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने १० जिंकत सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!