चंद्रकांत पाटलाची नजर कमजोर, त्यांना वैद्यकीय मदतीची गरज, संजय राऊतांचा टोला

दिल्ली- राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात वाद होत असल्याचे अनेकदा दिसून आले होते. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवर पाटील यांनी केलेल्या टिकेवरून शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटलांची नजर कमजोर झाली आहे. त्यांना दिसत नाही. ऐकायला येत नाही. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.
संजय राऊत यांनी आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना हा टोला पाटलांना लगावला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाली असून त्यांची तब्बेत बरी नाही. पुढच्या तीन चार दिवसात मुख्यमंत्री विरोधी पक्षांना दिसतील. ते सर्व कामकाजांवर लक्ष ठेवून आहेत. चंद्रकांत पाटलांची नजर कमजोर झाली आहे. त्यांना दिसत नाही. ऐकायला येत नाही. त्यांना मेडिकल हेल्पची गरज आहे. आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.
मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहत नाहीत म्हणून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. दुसऱ्याला मुख्यमंत्री करा अशी मागणी करीत आहेत. चंद्रकांत पाटील यांनीही काल रश्मी ठाकरे अथवा आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज सोपवावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री विधिमंडळाच्या अधिवेशनात येत नाहीत असे विरोधक म्हणत आहे. मीही म्हणतो आम्हालाही पंतप्रधान मोदी संसदेत दिसत नाहीत. ते या ठिकाणी येत नाहीत असं म्हणत राऊतांनी विरोधकांचे लक्ष वेधले आहे.