जहाजावरील ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन शाहरुख खानला एक दिवसाची पोलीस कोठडी

मुंबई: मुंबईवरून गोव्याकडे निघालेल्या आलिशान क्रूझवर चालणाऱ्या ड्रग पार्टीत सहभागी असलेल्या सुपरस्टार शाहरुख खान च्या मुलाला आर्यन खान ला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीच्या वकिलांनी या आरोपींकरीता दोन दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टानं या तीन आरोपींना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. आता उर्वरित पाच आरोपींना पोलीस कोर्टात कधी हजर करतात हे औत्स्युकाचे ठरणार आहे.
ज्येष्ठ वकील सतीश माने-शिंदे यांनी कोर्टात आर्यनची बाजू मांडली.
अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या एका आलिशान क्रूझवर छापा टाकत १२ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये ९ पुरुष आणि ३ मुलींचा समावेश आहे. याप्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेण्यात आले होते .
मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजामध्ये ड्रग्ज पार्टी होणार असल्याची खात्रीशीर माहिती एनसीबीच्या हाती लागली होती. या आधारावर एनसीबीच्या एका पथकाने प्रवासी बनून त्या जहाजामध्ये प्रवेश मिळवला होता. दरम्यान हे जहाज समुद्रात गेल्यानंतर काही वेळात कारवाईला सुरूवात केली. या जहाजावर ग्रीन गेटजवळ ही कारवाई करण्यात आली.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली आहे.
जहाज समुद्राच्या आतमध्ये गेल्यावर ड्रग्ज पार्टीला सुरूवात झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर होत असल्याचे निर्दशनास आल्यावर एनसीबीकडून कारवाईस सुरूवात झाली. एनसीबीचे पथक प्रवासी बनून गेल्याने या कारवाईचा मागमुस कोणालाही लागला नसल्याने सर्व संशयितांना रंगेहाथ पकडण्यात मदत झाली.