
मुंबई: बातमी, इतिहास पुन्हा लिहिला जाऊ शकतो, मात्र फोटो हे कायम त्या काळाचे साक्षीदार राहतात. त्यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या घटनेते फोटो टिपणं, संग्रहित करणं ही फोटोग्राफरची जबाबदारी आहे, असं सांगत ज्येष्ठ छायाचित्रकार रघू राय यांनी आज मुंबई प्रेस क्लबच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या picwire.com या वेबसाइटचे उद्घाटन केले. मुंबई आणि महाराष्ट्रातील ८० हून अधिक फोटोपत्रकारांनी आपले काम लोकांपर्यंत पोहचून त्यातून उत्पन्नाचे साधन मिळावे म्हणून ही वेबसाइट सुरू केली आहे.
फोटोपत्रकारांनी सहकारी तत्त्वावर सुरू केलेल्या या वेबसाइटचे राय यांनी कौतुक केले व सहकार्य म्हणून आपलेही फोटो या वेबसाइटवर देण्याते त्यांनी कबूल केले. सध्या कोविड काळामध्ये फोटोसंबंधित कामं कमी झाल्याचे मान्य करून राय यांनी फोटोपत्रकारांना त्या क्षेत्रामध्ये अर्थाजर्नाचे आणखी काय मार्ग असू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले. क्लबचे अध्यक्ष आणि द वायर या वेबसाइटचे संपादक सिद्धार्थ भाटिया यांनी या वेबसाइटकडून बऱ्याच अपेक्षा असून फोटो पत्रकारांसाठी ते एक व्यासपीठ असल्याचं सांगितलं. क्लबचे सचिव राजेश मॅस्केलनस यांनी ही वेबसाइट केवळ सुरुवात असून अजून त्यात वैविध्य आणणार असल्याचे सांगितले.
गेल्या दोन वर्षात कोविड महामारीमुळे सर्वांनाच आर्थिक नुक़सान सहन करावे लागले आहे. अनेक पत्रकार, फोटोपत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कापण्यात आले आणि आर्थिक स्त्रोत आटले. अशावेळी त्यांना मदत करण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने सहा महिन्यांपूर्वी हा उपक्रम हाती घेऊन कमीत कमी वेळात त्यासाठी लागणारे सर्व तांत्रिक सहकार्य केले.
आजपासून कार्यान्वयित झालेल्या या वेबसाइटच्या माध्यमातून मुंबई, खेळ, कोविड, राजकारण, बॉलिवूड या क्षेत्रातील अनेक फोटो रोज उपलब्ध होणार आहेत. तसेच विशेष फोटो, जुन्या फोटोंचे संग्रहही इथे बघायला मिळतील. माध्यम समूह, वर्तमानपत्रं, बातम्यांशी संबंधित वेबसाइट, खाजगी संस्था आणि एखादी व्यक्ती हे फ़ोटो वरील वेबसाइटवरून पैसे देऊन डाऊनलोड करू शकतात.
या कल्पनेमागे समर खडस, किर्ती पराडे, प्रविण काजरोळकर….आदींचा समावेश आहे. तसेच ही वेबसाइट आयटी तज्ज्ञ तिर्थराज सामंत आणि मिहिर बेल्लारे यांनी मोफत तयार करून दिली.