मुंबई

सामाजिक परिवर्तनासाठी विकासात्मक पत्रकारितेची आवश्यकता- डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई – सामाजिक परिवर्तनासाठी विकासात्मक पत्रकारितेची गरज आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. विधानभवनातील दालनात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघ आणि टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, विविध बातम्यांची शासनस्तरावर तत्काळ दखल घेवून कार्यवाही देखील केली जाते. शासनाच्या योजना, निर्णय आणि विधिमंडळाचे कामकाज जनतेपर्यंत पोहोचविण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असून तसे सहकार्य देखील मिळते. परंतु, ब्रेकिंग न्यूजबरोबर सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी विकासात्मक पत्रकारितेची गरज आहे. सकारात्मक बातम्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये आशा, आनंद निर्माण होण्यास मदत होते. विकासात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरिबांचे कल्याण होईल, असे कार्य माध्यम प्रतिनिधींनी करावे, असे आवाहनही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले.

यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ आणि टी.व्ही. जर्नलिस्ट असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ, पुस्तक देवून सत्कार केला. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी डॉ. गोऱ्हे यांना स्मृतीचिन्ह भेट देवून आभार मानले. या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष संदीप चव्हाण, टी.व्ही. जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव, राजेंद्र हुंजे यांनी मनोगत व्यक्त करुन सत्काराबद्दल उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!