मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन

मुंबई- अवघ्या सहा तासांमध्ये झालेल्या तब्बल 300 मिलिमीटर पावसाने मुंबई शहराची घडी विस्कटून टाकली आहे. अवघ्या काही तासांच्या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा आणि रस्ते वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. पुढील काही तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात भरती आहे. यावेळी समुद्रात ४.४० मीटर उंचीच्या लाटा उसळतील. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे.

सततच्या पावसामुळे मुंबईच्या आकाशातील दृश्यमानता कमी झाली आहे. याचा परिणाम मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीवरही झाला आहे. आतापर्यंत जवळपास 27 विमानांच्या दिशा बदलण्यात आल्या आहेत. ही सर्व विमानं मुंबईऐवजी अहमदाबाद, हैदराबाद आणि इंदौरच्या दिशेने वळवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मी करत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!