राज्यातील उत्तम काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा मुख्यमंत्री करणार सन्मान – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

रत्नागिरी :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ( NSS ) स्वयंसेवकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट कार्य केले असून त्यांचे काम आपणा सर्वांसाठी आदर्श असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘माझी वसुंधरा’ मोहिमेचा रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात श्री.सामंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ संपन्न झाला. यावेळी, मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी कोविड काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल गोगटे – जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे आयोजित सन्मान सोहळ्यात श्री.सामंत बोलत होते.
श्री.सामंत म्हणाले, कोविडच्या या लढ्यात राज्यातील सर्व विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपले अत्यंत महत्वपूर्ण असे योगदान दिले आहे. एनएसएस स्वयंसेवकांनी पोलीस मित्र, आरोग्य मित्र, महसूल मित्र म्हणून प्रत्यक्षपणे काम केलेले आहे. तसेच रक्तदान शिबीर, जनजागृती अभियान, परिसर निर्जंतुकीकरण , गरजूंना मास्क वाटप, भोजनाची व्यवस्था, अन्न वाटप, औषधांचे वाटप अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविले आहेत.
सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहचण्यासासाठी विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा एकूण ३७ एनएसएस स्वयंसेवकांचा जिल्हास्तरावर सन्मान होणार आहे. त्यानंतर यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या १३ कोविड योध्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे, असे श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
राज्यामध्ये सामाजिक चळवळ निर्माण करण्यात एनएसएसचा मोलाचा वाटा असून राज्यातील एनएसएसचा आदर्श देशभरातल्या इतर राज्यांनी घ्यावा, असे काम राज्यातील चार लक्ष स्वयंसेवक करीत असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी, एनएसएस सल्लागार समितीचे सदस्य अंकित प्रभू, रत्नागिरी सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, एनएसएस राज्य संपर्क अधिकारी प्रभाकर देसाई, कार्यक्रम समन्वयक सुधीर पुराणिक, प्राचार्य श्री.कुलकर्णी, पुरस्कारार्थी विद्यार्थी आणि संबंधित उपस्थित होते.