महाराष्ट्र

दिव्यांग क्रीडा महोत्सव दहिसर येथे उत्साहात संपन्न ; 130 दिव्यांगांनी अनेक खेळांचा लुटला आनंद

मुंबई, : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 7 डिसेंबर 2025 रोजी दहिसर येथील दहिसर स्पोर्ट्स फौंडेशनच्या भव्य पटांगणावर स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान या दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे दिव्यांग क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण मुंबईतून जवळजवळ 130 दिव्यांग व्यक्तींनी या क्रीडा महोत्सवात अनेक खेळांचा आनंद लुटला आणि भरघोस पारितोषिके पटकावली. खेळ हा फक्त शरीराने धडधाकट असलेल्या व्यक्तींपुरता मर्यादित न राहता त्याचा आनंद दिव्यांग व्यक्तींनी सुद्धा लुटावा आणि त्यातूनच पॅरा स्पोर्ट्स या विषयांमध्ये दिव्यांग व्यक्तींनी पुढे जावे, या उद्देशाने स्नेहज्योत या दिव्यांग क्रीडा महोत्सवाचे आयोजन गेली 4 वर्षे सातत्याने करीत आहे. यासोबतच पॅरा स्पोर्ट्स मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भरीव कामगिरी करणाऱ्या 2 दिव्यांग व्यक्तींना ‘स्नेहज्योत शक्तिशाली व्यक्तिमत्व पुरस्कारा’ने गौरविण्यात येते. यंदाचा पुरस्कार पॅरा फेन्सिंग मध्ये गोल्ड मेडलिस्ट नीतू मेहता आणि स्विमिंग व बास्केटबॉल मध्ये गोल्ड मेडलिस्ट तृप्ती चोरडिया यांनी पटकावला. सन्मानपत्र आणि 11 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असते.

क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते झाले आणि पारितोषिक वितरणाचा सोहळा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक अधिकारी श्रीमती अनिता पाटील आणि माजी आमदार  विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

अनिता पाटील यांनी दिव्यांगांच्या भावनेचे कौतुक करताना सांगितले की, शारीरिक व्याधींची तक्रार न करता ज्या उत्साहाने आणि आनंदाने सर्व दिव्यांग स्पर्धक या क्रीडा महोत्सवात सहभागी झाले, ही कौतुकास्पद बाब आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच सुरू होणाऱ्या छोट्या ट्रेनची एक दिवसाची सफर स्नेहज्योतच्या सर्व दिव्यांग सदस्यांना मोफत देण्यात येईल, अशी घोषणा केली. विजेत्यांना आणि शक्तिशाली पुरस्कार त्यांच्यातर्फे विशेष पुरस्कार देण्यात येतील असे आश्वासित केले.

आपले दैनंदिन आयुष्य वेगवेगळ्या शारीरिक कौटुंबिक सामाजिक आर्थिक अडचणींना तोंड देत आयुष्य जगणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना आयुष्यातला एक दिवस अगदी निखळ आनंदाने जगता यावा हा स्नेहज्योत संस्थेचा उद्देश सफल झाला असल्याचे मनोगत स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या महासचिव सौ. सुधा वाघ यांनी सांगितले.

सर्व स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी या सोहळ्याला अभिनेते अविनाश नारकर, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ  गिरीश महाजन, उद्योजक आणि समाजसेवक  सुधीर दड्डीकर, तहसीलदार ईश्वर चप्पलवार, समाजसेवक राजीव सिंघल, एस एस बॅगचे संचालक संदीप दळवी उपस्थित होते.

सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक विशेष अतिथीने संपूर्ण क्रीडा महोत्सवाचे ज्या पद्धतीने अतिशय शिस्तबद्ध नियोजन केले गेले होते, त्याबद्दल स्नेहज्योतच्या संस्थापिका आणि महासचिव सुधा वाघ, अध्यक्षा अपर्णा कायकिणी, खजिनदार मिलिंद तेंडुलकर, विश्वस्त सुप्रिया फडके, डॉक्टर मंजुषा शेवाळे, माधवी गव्हाणकर सल्लागार दीपक पराडकर तसेच स्नेहज्योतचे सर्व सेवाव्रती यांचे मनापासून कौतुक केले. या क्रीडा महोत्सवाचे सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त विजय कलमकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!