राजापुरात एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
एसटी कर्मचारी संतप्त; आगार प्रमुखांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागण

राजापूर :- संपात निलंबित केल्याने हृदविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेल्या राजापूर आगारातील चालक कम वाहक राकेश रमेश बांते ( वय ३५) याच्या मृत्युनंतर एसटी कर्मचारी व पत्नीने आक्रमक पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी आगार प्रमुखांवर सदोष मन्युष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी पत्नी भाग्यश्री बांते यांनी केली आहे.
तर बांते यांच्या पत्नी व दोन्ही मुलांच्या संगोपनाबाबत प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांना हे निवेदन देण्यात आले.निवेदनानुसार, माझे पती राकेश रमेश बांते हे राजापूर आगार येथे एसटी कर्मचारी दुखवट्यात सामील झाले होते. यामुळे त्यांच्यावर आगार व्यवस्थापकांनी निलंबनाची कारवाई केलेली होती.
तेव्हापासून ते मानसिक दडपणाखाली होते. त्यामुळे माझ्या पतीच्या मृत्युस राजापूर आगार व्यवस्थापक हेच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी, अशी मागणी पत्नी भाग्यश्रीने केली आहे.