आवडता प्लॅन निवडा आणि बेस्टने कुठेही प्रवास करा, वाचा बेस्टची नवी संकल्पना

मुंबई – प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्टने भन्नाट आयडिया आणलेली आहे. बेस्टने प्रवाशांसाठी पैसे बचत करणारे हव्या त्या मार्गांवर प्रवास करण्याची मुभा देणारे ७२ प्रकारचे वेगवेगळे प्लॅन बेस्टने आणले आहेत. आपल्या प्रवासाच्या गरजा पाहून दररोज प्रवास करायचा आहे की थोडया दिवसांसाठी प्रवास करायचा आहे. याप्रमाणे आपला हवा तो प्लॅन आता निवडता येणार आहे. बेस्टचे मोबाईल ऍप आणि स्मार्टकार्डवरही योजना लवकरच लागू होणार आहे.
या योजनेत पैशाची बचत होणार असून एका फेरीसाठी अवघे १.९९ रुपये लागणार आहेत. या योजनेत बेस्टच्या नेटवर्कवर कुठेही प्रवास हवा तसा प्रवास करण्याची किंवा निवडक भाडे टप्प्यात एसी किंवा नॉन-एसी बसने प्रवास करण्याची मूभा राहणार आहे. यात प्रवाशांना एका दिवसाच्या प्लॅनपासून ८४ दिवसांच्या प्लॅनची निवड करता येणार आहे.
तसेच २ फेऱ्या ते १५० फेऱ्यापर्यंतची निवड करता येणार आहे. प्रवाशांना त्यांनी निवडलेल्या भाडे टप्प्यानुसार कोणत्याही स्टॉपपासून कोणत्याही स्टॉपपर्यंत प्रवास करता येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले विद्यार्थ्यांचे पास आणि अमर्यादित अंतराचे बसपासदेखील या नवीन योजनेत कायम राहणार आहेत.मात्र, दुसरीकडे येणाऱ्या मुंबई मनपाच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा प्लॅन आणल्याची चर्चा होत आहे.