आरे कॉलनीत हैदोस घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला !
वनखात्याच्या कारवाईला मिळाले यश

मुंबई:एकाच आटवड्यात तीन जणांवर प्राणघातक हल्ला करून आरे मिल्क कॉलनीत दहशत माजविणारा बिबट्या अखेर वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात आज अडकला.आरे कॉलनीतील युनिट नंबर 3 येथे बिबट्याच्या संभाव्य मार्गावर काल वनखात्याने पिंजरा लावला होता.याच सोबत या बिबट्याला पकडण्याच्या हेतूने वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागता पहारा ठेवला होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी येथेच बिबट्याचे एक पिल्लू देखिल सापडले होते.अखेर आज पहाटे 3 च्या सुमारास बिबट्या वनखात्याच्या पिंजऱ्यात अलगद अडकला.
वनखात्याचे तळाशी येथील रेंज ऑफिसर दिनेश दिसले यांनी या बाबत अधिकृत वृत्त दिल्याने आरे वासियांनी काही काळासाठी तरी सुटकेचा निश्वास सोडला आहे.जेरबंद झालेल्या बिबट्याला आज सकाळी सात वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घेऊन जाण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.आरेत हैदोस घालणारा हाच तो बिबट्या आहे का याची खातरजमा करणार असल्याची माहिती देसले यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून आरे कॉलनी व दिंडोशी येथील न्यू म्हाडा कॉलनीतील वसाहतींमधून बिबट्याने दिवसाढवळ्या दहशत माजविली असल्याची वृत्ते गोरेगाव मिरर व मिरर महाराष्ट्र्र मधून सातत्याने प्रसिद्ध होत होती. तसेच वनखात्याच्या व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेवर देखील सवाल केले होते.
गेल्या महिनाभरात तर आरे कॉलनीमध्ये एकूण पाच जणांवर बिबट्याने हल्ले केले होते. यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.दि,26 रोजी आयुष यादव या चार वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला होता.तर त्या नंतर दोनच दिवसांनी म्हणजे दि,28 रोजी 64 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला.मात्र या शूर महिलेने हातातील काठीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बिबट्यावर प्रतिहल्ला करून व आरडाओरडा करून पळवून लावले होते. .तर काल रात्री आठच्या सुमारास युनिट नंबर 7 येथे आपल्या मित्राला भेटायला गेलेल्या संतोष नगर येथील तरुणावर बिबट्याने हल्ला केला. अशाप्रकारे एकाच आठवड्यात बिबट्याने तीन जणांवर प्राणघातक हल्ले करून जखमी केल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती.
आज वनखात्याने जरी एक बिबट्या पकडला असला तरी आरे व दिंडोशी परिसरात अनेक बिबट्या असल्याचे बोलले जात आहे.
उदासीन लोकप्रतिनिधी
प्रस्तुत प्रतिनिधीने काही दिवसांपूर्वी उपमहापौर व येथील महापालिका प्रभाग क्रमांक ४० चे नगरसेवक सुहास वाडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी न्यू म्हाडा कॉलनीतील डोंगर हा रहेजा बिल्डर च्या मालकीचा असल्याने त्याच्याकडे तुम्ही या परिसराला संरक्षक जाळी बसवून देण्याची मागणी करा असा अजब सल्ला देऊन मुंबई महापालिकेतर्फे जाळी लावण्याच्या नागरिकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या.
त्यामुळे आता न्यू म्हाडा कॉलनी परिसरात पिंजरे लावण्यासाठी बिबट्यांच्या हल्ल्याची वनखाते व लोकप्रतिनिधी वाट पहात आहेत का? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.