मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहीले मोदींना पत्र, बंगळुरू प्रकरणात लक्ष घालण्याची केली विनंती

मुंबई | कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली आहे. राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील कर्नाटकातील शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे’ अशी मागणी केली आहे.
बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका. गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे असे सुद्धा पत्रात नमूद केले आहे.