प्रविण दरेकरांना सहकार विभागाची नोटीस; कारवाई होण्याची शक्यता

मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तसेच मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रविण दरेकर हे ‘मजूर’ आहेत किंवा नाही याची उच्च पातळीवर चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याच्याही सूचना सहकार आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. या चौकशी अहवालानंतर प्रविण दरेकर यांच्या पात्र आणि अपात्रतेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सहकार विभागाने प्रविण दरेकर यांना नोटीस पाठवली असून तुम्हाला अपात्र का घोषित करु नये? असा प्रश्न विचारला आहे.
प्रविण दरेकर यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालकपदाच्या निवडणुकीसाठी मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे. संचालकपदाच्या निवडणुकीसाठी तुम्ही मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल केला. त्यामुळे तुम्ही कुठल्या पद्धतीने मजूर वर्गात मोडता, अशी विचारणा सहकार विभागाने प्रविण दरेकर यांना एक नोटीस पाठवून केली आहे. मात्र, या नोटीसमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. आता यावर प्रविण दरेकर काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रविण दरेकर गेल्या अनेक वर्षापासून बँकेचे अध्यक्ष आहेत. मात्र, ते मजूर वर्गातूनच निवडून येतात. खरे तर मजूर सहकारी संस्थेनुसार, अंगमेहनत करणारी व्यक्ती ही मजूर म्हणून गृहीत धरली जाते. त्यामुळे आता दरेकर नमके कशा प्रकारे मजूर वर्गात मोडतात, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र याच मुद्दयावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.