‘कंगनाच्या गालापेक्षा चिकने रस्ते आम्ही बनवणार’ पुन्हा ‘या’ आमदारांचे वादग्रस्त विधान

झारखंड- सतत वादग्रस्त ट्विट आणि विधाने करून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रानौत हिच्यासंदर्भात चक्क एका आमदाराने वादग्रस्त विधान करून स्वतःच्या अंगावर नवा वाद ओढावून घेतला आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले जातील, असं वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी यांनी केले आहे.
अन्सारी हे झारखंडच्या जामताडामधील काँग्रेस आमदार आहेत. ते नेहमी वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्ये केल्याने चर्चेत राहिले आहेत. लालू प्रसाद यांच्या शैलीत ते म्हणाले की, अभिनेत्री कंगना रणौतच्या गालापेक्षा जामताडाचे रस्ते चिकने बनवले जातील. मात्र आता यावरून नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहेत.
या रस्त्यांमुळे आदिवासी मुले, तरुण आणि व्यापारी वर्गाला फायदा होईल. काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या रस्त्यांबाबत बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालासारखा सुंदर रस्ता तयार करीन, असेच विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता.