आमदारांना घरं मिळणार या निर्णयावर जितेंद्र आव्हाडाचं मोठं स्पष्टीकरण, म्हणाले आमदारांना घरं मिळणार पण..

मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत सर्व पक्षीय आमदारांना घरे मिळणार असल्याची घोषणा केली.या घोषणेनंतर राज्यातील सर्वसामान्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांनीच या निर्णयाचा कडकडून विरोध केला. श्रीमंत असलेल्या आमदारांना पुन्हा घराची गरज कशासाठी आहे? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित राहू लागला.
विरोधकांनी ट्विटच्या माध्यमातून तसंच पत्रकार परिषदेमधून या निर्णयाला विरोध दर्शविला.मात्र, आता हा वाढता विरोध पाहता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत,’आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत आणि बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे,’ असं स्पष्टीकरण दिलं आहे.
मात्र,यावर शंका उपस्थित करत घराची खरी गरज आमदारांना आहे की मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद विधवा महिलांना आहे,असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला.तसंच मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.