ओमायक्रॉनच्या चाचण्यांसाठी स्वतंत्र किटला ICMR ची मंजुरी, आता RT-PCR मधूनच होणार निदान!

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. ओमायक्रॉन वेगाने जगभर पसरत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
अद्याप ओमायक्रॉन जीवघेणा ठरल्याची कोणतीही माहिती आली नसल्यामुळे काहीसं दिलासादायक चित्र असलं, तरी देखील त्याचा वेगाने फैलाव होत असल्यामुळे सर्वच देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनविरोधातील लढ्यामध्ये एक नवं साधन आरोग्य यंत्रणेच्या हाती आलं आहे.
आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स तर्फे तयार करण्यात आलेल्या RT-PCR किटला मान्यता दिली आहे. Omisure असं या नव्या टेस्टिंग किटचं नाव आहे. ओमिश्यूअरमुळे आता जेनोम सिक्वेन्सिंगसाठी न पाठवता देखील ओमायक्रॉनच्या बाधेचं निदान करणं शक्य होणार आहे.
ओमिश्यूअर आरटीपीसीआर किट आरोग्य यंत्रणेच्या हाती आल्यामुळे ओमायक्रॉनचं लवकरात लवकर निदान करून जास्तीत जास्त व्यक्तींच्या चाचण्या करणं शक्य होणार आहे.